रायगड, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। तालुक्यात बोगस आणि नामधारी पत्रकारांचा सुळसुळाट वाढत असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. हवशे, नवशे आणि गवशे या “पत्रकार” वर्गाने विविध भागांत सक्रिय उपस्थिती दाखवत प्रामाणिक पत्रकारांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला असल्याची तक्रार स्थानिक पत्रकार संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.
काही व्यक्ती स्थानिक वृत्तपत्रांसारखी नावे वापरून किंवा युट्यूब व फेसबुकवरील स्वतःच्या पेजद्वारे बातम्या प्रसारित करत आहेत. जुनी अथवा इतर माध्यमांतील बातम्या कॉपी करून “लाईव्ह” स्वरूपात प्रसारित करणे आणि विविध ग्रुपवर शेअर करणे, अशी सर्रास पद्धत सुरू आहे. यामुळे लोकशाहीतील चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवरील विश्वास डळमळीत होत चालल्याचा इशारा पत्रकार संघटनांनी दिला आहे. आर.एन.आय. नोंदणी न करता आणि कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता हे स्वयंघोषित संपादक व रिपोर्टर कार्यरत आहेत. काहीजण राजकीय पक्षांशी आर्थिक व्यवहार करून पेड न्यूज प्रसारित करीत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. या बनावट पत्रकारांनी पत्रकार परिषद, सभा व मेळावे याठिकाणी मोबाईल शूटिंग करून पैसे उकळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
पत्रकारितेशी संबंधित कोणतीही शैक्षणिक पात्रता, शासनमान्य कोर्स किंवा नोंदणी नसतानाही ‘संपादक’ अथवा ‘प्रमुख प्रतिनिधी’ अशी पदव्या धारण करून सोशल मीडियावर वावरणारे हे स्वयंघोषित पत्रकार निवडणुकीच्या काळात विशेषतः सक्रीय होतात. अशा व्यक्ती पत्रकारांच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साधत असल्याने खऱ्या पत्रकारितेच्या मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.डिजिटल युगात माहितीचा झपाट्याने प्रसार होत असला, तरी नियंत्रण यंत्रणेअभावी बोगस पत्रकारांचा प्रभाव वाढत आहे. कर्जत तालुक्यातील पत्रकारितेतील दिशाभूल, फसवणूक आणि गोंधळ थांबवण्यासाठी शासनाने ठोस आणि प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी समाजमाध्यमांतून जोर धरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके