पुणे, 8 ऑक्टोबर (हिं.स.) - कराडचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार तथा माजी क्रीडा मंत्री शामराव अष्टेकर यांचे पुण्यात निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. आज, बुधवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी वैकुंठधाम, नवीपेठ, पुणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते बालेवाडी येथील कपिल उपवन सोसायटीत वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कराड आणि सातारा जिल्ह्याच्या राजकीय व क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शामराव अष्टेकर यांचा जन्म २ ऑगस्ट १९३४ रोजी कराड येथे झाला. अष्टेकर समाजवादी काँग्रेसमधून १९८५ आणि १९९० मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. शरद पवार यांचे निष्ठावंत सहकारी होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर शामराव अष्टेकर हे कराड उत्तर मधून आमदार म्हणून निवडून आले. पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुल उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री म्हणून देखील काम पाहिले होते. क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानाची सातारा जिल्ह्यात सर्वत्र दखल घेतली जाते. त्यांचा मोठा जनसंपर्क होता. कराडच्या स्थानिक राजकारणावरही त्यांची एकेकाळी पकड होती.
भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, कराड उत्तरचे माजी आमदार, माजी क्रीडा मंत्री शामराव बाळकृष्ण अष्टेकर यांचे निधन झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले कार्य आणि पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल उभारणीमध्ये त्यांनी दिलेले योगदान बहुमोल आहे. या दुःखद प्रसंगी अष्टेकर परिवाराप्रती सहवेदना व्यक्त करतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी