नंदुरबार, 8 ऑक्टोबर (हिं.स.) ग्रंथालय संचालनालय, यांच्यामार्फत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता आणि राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून राबवण्यात येत असलेल्या 50 व्या ग्रंथ भेट योजनेसाठी निवड झालेल्या ग्रंथांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी सर्व संबंधितांसाठी अवलोकनार्थ खुली ठेवण्यात आली असून यादीतील कोणत्याही ग्रंथाबाबत काही सूचना, हरकती किंवा आक्षेप असल्यास, ते १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत लेखी स्वरूपात ग्रंथालय संचालनालयाकडे पाठवावेत असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी सन २०२३ मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी एकूण १ हजार ३८८ ग्रंथांची निवड केली आहे. निवड झालेल्या ग्रंथांमध्ये मराठीचे ७४९, हिंदीचे २९७ आणि इंग्रजीचे ३४२ ग्रंथांचा समावेश आहे. यादीतील निवड झालेले ग्रंथ किमान २५ टक्के सूट दराने वितरीत करणे प्रकाशकांना बंधनकारक असेल. निवड झालेल्या ग्रंथांची ही यादी ग्रंथालय संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळ www.dol.maharashtra.gov.in यावर १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली आहे. असून हरकती किंवा आक्षेप असल्यास ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई-४०० ००१ ईमेल आयडी: director.dol@maharashtra.gov.in यावर लेखी स्वरुपात पाठवाव्यात. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही सूचना, हरकती किंवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही तसेच यादीतील ग्रंथाचे नाव, लेखक, प्रकाशक व किंमत यामध्ये काही बदल असल्याचे निदर्शनात आणून दिल्यास त्याचे स्वागत करण्यात येईल, असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर