मुंबई, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। विविध क्षेत्रांत कार्यरत व २३ अब्ज अमेरिकन डॉलर इतके मूल्य असलेल्या जेएसडब्ल्यू समूहाचा एक भाग असलेल्या जेएसडब्ल्यू सिमेंट कंपनीने, आपल्या शिवा सिमेंट या उपकंपनीमार्फत, ओडिशातील संबलपूर येथे अत्याधुनिक सिमेंट ग्राइंडिंग युनिट सुरू केले आहे.
पूर्व भारतातील बाजारपेठेत आपले अस्तित्व अधिक मजबूत करण्याच्या आणि या भागातील वाढत्या मागणीची पूर्तता करण्याच्या उद्देशाने कंपनीने ही नवी सुविधा उभारली आहे. ही यंत्रणा ‘भूषण पॉवर अँड स्टील लिमिटेड’ (बीपीएसएल) यांच्यासोबतच्या व्यावसायिक करारानुसार, शिवा सिमेंट या उपकंपनीच्या निधीतून व देखरेखीखाली उभारण्यात आली आहे. या युनिटची उत्पादन क्षमता १.० दशलक्ष टन प्रति वर्ष (एमटीपीए) असून, ती फक्त ‘शिवा सिमेंट’च्या वापरासाठीच राखीव असेल. या नव्या प्रकल्पामुळे जेएसडब्ल्यू सिमेंट आणि तिच्या उपकंपन्यांची एकत्रित स्थापित उत्पादन क्षमता २१.६ एमटीपीएपर्यंत वाढली आहे.
आज याबाबतची घोषणा करताना ‘जेएसडब्ल्यू सिमेंट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नार्वेकर म्हणाले, “देशाच्या पूर्व भागात येत्या काही वर्षांत झपाट्याने विकास होणार आहे. राज्यातील उत्पादन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील वेगवान विस्तारामुळे ओडिशा हे या भागातील औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीचे केंद्रबिंदू बनत आहे. संबलपूर येथे उभारलेला हा अत्याधुनिक कारखाना म्हणजे ‘जेएसडब्ल्यू सिमेंट’चा एक दूरदर्शी व धोरणात्मक उपक्रम असून, या बाजारपेठेत आपले स्थान बळकट आणि विस्तृत करण्याच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. जागतिक दर्जाची ही यंत्रणा ‘जेएसडब्ल्यू सिमेंट’च्या पर्यावरणपूरक कार्यक्षेत्राला आणखी मजबुती देईल आणि विस्तार देईल.”
‘शिवा सिमेंट’चे उत्पादन केंद्र हे तीन राज्यांच्या — ओडिशा, छत्तीसगड आणि झारखंड — सीमेवर धोरणात्मकरीत्या वसलेले असून, सिमेंट उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या जवळ असल्यामुळे ते भौगोलिकदृष्ट्या अत्यंत लाभदायक ठिकाणी आहे.
जेएसडब्ल्यू सिमेंट आपला देशव्यापी विस्ताराची योजना यशस्वीपणे पुढे नेत आहे. या योजनेंतर्गत, कंपनीचे उद्दिष्ट ४१.८५ दशलक्ष टन प्रतिवर्ष (एमटीपीए) इतकी ग्राइंडिंग क्षमता आणि १३.०४ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्लिंकर उत्पादन क्षमता निर्माण करण्याचे आहे. राजस्थानातील नागौर येथील एकात्मिक प्रकल्पाचे काम नियोजनाप्रमाणेच सुरू असून, या प्रकल्पात ३.३० एमटीपीए क्लिंकर उत्पादन क्षमता आणि ३.५ एमटीपीए ग्राइंडिंग क्षमता असणार आहे.
कंपनी सध्या सिमेंट उद्योगातील कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाचे सर्वात कमी प्रमाण राखणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. आर्थिक वर्ष २०२५–२६ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचे उत्सर्जन प्रमाण प्रति टन सिमेंट पदार्थामागे फक्त २७७ किलो सीओटू इतके राहिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule