नागपूर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। मागील तीन वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘झुंड’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेता प्रियांशू उर्फ बाबू छत्री याची बुधवारी(दि.८) नागपूरमध्ये हत्या झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘नारा’ भागात घडली आहे. बुधवारी रात्री दीडच्या सुमारास प्रियांशू वायरने बांधलेल्या अवस्थेत जखमी स्थितीत आढळून आला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रियांशुला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की, प्रियांशूची बहीण शिल्पा छत्री हिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी हत्यााचा गुन्हा नोंदवला असून, ध्रुव शाही नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासानुसार, परस्पर वैमनस्यातून आरोपीने प्रियांशुचा गळा वायरने चिरून निर्घृणपणे हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत, आणि लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
प्रियांशुने ‘झुंड’ या चित्रपटात ‘बाबू’ हे पात्र साकारले होते. या चित्रपटात तो आपल्या डायलॉग्समुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिला होता. ‘झुंड’ ही फिल्म झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या आयुष्यावर आधारित होती, ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी निवृत्त फुटबॉल कोचची भूमिका साकारत होते. प्रियांशुने या चित्रपटात साकारलेली भूमिका लक्षणीय ठरली होती. त्याने ‘बाबू’ या पात्रामधून एक खऱ्या अर्थाने झोपडपट्टीतल्या युवकाचं वास्तव प्रेक्षकांसमोर मांडलं.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode