परभणी महानगरपालिका कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन
परभणी, 8 ऑक्टोबर (हिं.स.)गेल्या पाच महिन्यांपासूनचे वेतन थकल्याच्या निषेधार्थ महानगरपालिकेतील संतप्त कर्मचार्‍यांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.गेल्या पाच महिन्यांपासून कर्मचार्‍यांचे वेतन थकल्याने या कर्मचार्‍यांसमोर अनेक प्रश्‍न उभे र
महानगरपालिका कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन सुरु ः पाच महिन्यांपासूनचे थकीत वेतन ः मनपा तिजोरीत खडखडाट


परभणी, 8 ऑक्टोबर (हिं.स.)गेल्या पाच महिन्यांपासूनचे वेतन थकल्याच्या निषेधार्थ महानगरपालिकेतील संतप्त कर्मचार्‍यांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.गेल्या पाच महिन्यांपासून कर्मचार्‍यांचे वेतन थकल्याने या कर्मचार्‍यांसमोर अनेक प्रश्‍न उभे राहीले आहेत. सणा सुदीच्या काळातसुध्दा सण साजरा करता येईनासा झाला आहे. आज ना उद्या वेतन होईल, या प्रतिक्षेत हे कर्मचारी कार्यरत होते. परंतु, या कर्मचार्‍यांचा आता संयम सुटला आहे. विशेषतः महापालिका आयुक्तांद्वारे वेतनासंदर्भात कोणतीही ठोस पाऊले उचलली जात नाहीत, त्या दृष्टीने कृती व पाठपुरावा केला जात नाही, असा आरोप करीत या आंदोलनकर्त्यांनी आता आंदोलनाशिवाय पर्यायच उरला नाही, अशी खंत व्यक्त केली.

महानगरपालिका कार्यालयासमोर सुरु झालेल्या या आंदोलनात शेकडो कर्मचारी सहभागी झाले असून या आंदोलनकर्त्यांनी प्रशासन व शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करीत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. आजपासून सुरु झालेल्या या कामबंद आंदोलनात महाराष्ट्र राज्य नगरपालिका-नगरपंचायत सर्व अधिकारी-कर्मचारी संघटना सक्रियपणे सहभागी झाली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के. के. आंधळे, अध्यक्ष नासेर बापू खान, के. के. भारसाकळे, विशाल उफाडे यांच्यासह मोठ्या संख्येने मनपा कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, प्रशासनाने तातडीने वेतन वितरणाबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा या कर्मचार्‍यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande