अमरावती, 8 ऑक्टोबर (हिं.स.) : अमरावती महानगरपालिकेतर्फे प्लॅस्टिकमुक्ती अभियानाअंतर्गत स्थानिक कडवी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत मनपाच्या पथकाने बंदी असलेल्या प्लॅस्टिक साहित्याचा पाच ट्रक मोठा साठा जप्त केला. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व सहाय्यक आयुक्त अविनाश रघटाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग व स्वच्छता विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. मनपाचे पथक कडवी बाजार परिसरात दाखल झाले. तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात बंदी घातलेल्या प्लॅस्टिक पिशव्या, एकदाच वापरायचे कप, प्लेट्स, ग्लासेस आणि अन्य प्लॅस्टिक साहित्य विक्रीसाठी ठेवलेले आढळले. मनपाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित ती सर्व सामग्री ताब्यात घेऊन पाच ट्रक प्लॅस्टिक साठा जप्त केला व पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली. पूर्वसूचना देऊनही अनेक व्यापारी बंदी घातलेल्या प्लॅस्टिकचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आल्याने मनपाने ही कठोर कारवाई केली. या मोहिमेत अतिक्रमण निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले होते. राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार बंदी घातलेले प्लॅस्टिक वापरू नये. प्लॅस्टिकमुक्त अमरावती हे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी स्वयंस्फूर्त सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केले आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी