शालेय स्तरावर एनसीसी प्रशिक्षणाची अंमलबजावणी करावी - माणिकराव कोकाटे
मुंबई, 8 ऑक्टोबर (हिं.स.) : राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, निरोगीपणा आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत यासाठी शालेय स्तरावर राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) प्रशिक्षण देण्यात यावे, असे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी द
शालेय स्तरावर एनसीसी प्रशिक्षणाची अंमलबजावणी करावी - माणिकराव कोकाटे


मुंबई, 8 ऑक्टोबर (हिं.स.) : राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, निरोगीपणा आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत यासाठी शालेय स्तरावर राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) प्रशिक्षण देण्यात यावे, असे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), स्काऊट आणि गाईड संदर्भातील बैठकीत क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. कोकाटे यांनी ही भूमिका मांडली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शालेय स्तरावर एनसीसी प्रशिक्षण सुरू करण्यासंदर्भात केंद्र शासनाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना, शिस्त आणि क्रीडाप्रेम अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी आयुक्त शितल तेली, एनसीसीचे कॅप्टन जे. जॉर्ज, सहाय्यक संचालक मिलिंद दीक्षित, शिक्षण उपसंचालक डॉ. वंदना वाहूळ, शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव अनिरुद्ध कुलकर्णी उपस्थित होते.

मंत्री कोकाटे म्हणाले की, माजी सैनिक, एनसीसीचे विद्यार्थी आणि क्रीडा शिक्षकांच्या मदतीने शाळेतील शिक्षकांना क्रीडा आणि कवायतीचे प्रशिक्षण द्यावे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच शारीरिक स्वास्थ्य, स्वयंशिस्त आणि प्रगल्भ विचार निर्माण होण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची आवड निर्माण करण्यासाठी शालेय स्तरावर सक्तीचे क्रीडा प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. भविष्यात ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी विविध खेळांचे प्रशिक्षण देण्याचे धोरण तयार करावे. तसेच, क्रीडा शिक्षकांची संख्या वाढविण्यासाठी आणि क्रीडा स्पर्धांतील विजेत्या खेळाडूंना शिक्षक म्हणून नियुक्तीत विशेष सवलत देण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, असेही त्यांनी सांगितले.

एनसीसीचे प्रशिक्षण हे नेतृत्वगुण, चारित्र्यसंवर्धन, सेवाभाव आणि खिलाडूवृत्ती विकसित करण्याचे प्रभावी साधन आहे. देशाच्या आपत्कालीन परिस्थितीत सहाय्यभूत होऊ शकेल अशी शिस्तबद्ध प्रशिक्षित तरुण शक्ती घडविणे हे एनसीसीचे उद्दिष्ट आहे. तसेच, स्काऊट-गाईडच्या माध्यमातून ग्रामीण, शहरी आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये सहिष्णुता आणि नैतिक मूल्यांची जपणूक केली जाते.

बैठकीदरम्यान देण्यात आलेल्या माहितीनुसार, वर्ष २०२३-२४ मध्ये राज्यातील विद्यालये व महाविद्यालयांमधील एनसीसी अंतर्गत एकूण १,००,८८४ विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत, यामध्ये कनिष्ठ विभागात ६१,३२८ आणि वरिष्ठ विभागात ३९,५०२ विद्यार्थी सहभागी आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande