मुंबई, 8 ऑक्टोबर (हिं.स.) - काही नेते विशिष्ट जातीबाबत टोकाची भूमिका घेतात. त्यांच्या वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा खराब होते आणि त्याची राजकीय किंमत पक्षाला मोजावी लागते, अशा शब्दात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची अजित पवारांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे बैठक झाली. या बैठकीत अजित पवार विरुद्ध छगन भुजबळांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळाले.
छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलनानंतर सरकारकडून काढण्यात आलेल्या जीआरबाबत मांडलेली भूमिका आणि अन्य मुद्यांवर उपरोक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे युतीबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घ्या, असा सूर बैठकीत उमटला. सध्या राज्याची आर्थिक स्थिती फार भक्कम नाही. तरी शेतकरी दिलासा देण्यासाठी पॅकेज दिले. त्यावरून विरोधकांनी आरोप केले तरी आपले सरकार काम करते हे जनतेला आवर्जून सांगा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत पुढील आठवड्यात जिल्हाध्यक्ष बैठक घेऊन अधिक चर्चा केली जाईल.
मराठा हा सामाजिक मागास नाही - भुजबळ
सरकारकडून मराठवाड्याचा 8 जिल्ह्यातील नोंदी शोधण्याबाबत सांगितलं जात आहे. मराठा आरक्षणासाठी जो जीआर काढण्यात आला आहे, तो दबावाखाली काढण्यात आला आहे. सरकारने ओबीसी समाजाची जी समिती निर्माण केली, त्याबाबत देखील कोणतीही चर्चा झालेली नाही. हा जीआर काढण्यापूर्वी हरकती सूचना घेणं अपेक्षित होतं. मात्र, सरकारकडून ते देखील झालं नाही. हे मुद्दे ओबीसी नेत्यांनी दिलेल्या पत्रात लिहिले आहेत. या सोबतच हा जीआर रद्द करा, अशी मागणी छगन भुजबळांकडून करण्यात येतं आहे. जीआरमध्ये तुम्ही कुणबी मराठा, मराठा कुणबी असं म्हणायला पाहिजे होतं. मात्र, तुम्ही जीआरमध्ये मराठा समाज असा उल्लेख केला आहे. एसईबीसी कायद्यानुसार आधीच 10 टक्के आरक्षण मराठा समाजाला दिले आहे, मराठा समाज शैक्षणिक आर्थिक मागास यासाठी हे आरक्षण दिलं आहे. पण, मराठा हा सामाजिक मागास नाही, अशी भूमिका भुजबळांनी स्पष्ट केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी