रत्नागिरी, 8 ऑक्टोबर, (हिं. स.) : चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्वर्यु प्रकाश देशपांडे यांना पुणे येथे ज्येष्ठ इतिहासकार डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते स्नेहांजली पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात कोजागिरी पौर्णिमेला मंगलप्रसंगी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात स्नेहांजली पुरस्काराचे तेविसावे वर्ष साजरे करण्यात आले. यावेळी डॉ. देगलूरकर म्हणाले, “प्रकाशराव देशपांडे हे चिपळूणचे सम्राट आहेत. चिपळूण हे त्यांचे अधिराज्य आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी उपस्थित होते. स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, ज्येष्ठ लेखिका वसुधा परांजपे आणि लेखक आशुतोष बापट मंचावर विराजमान होते.
कार्यक्रमात वसुधा परांजपे लिखित ‘स्वराज्याच्या सौदामिनी’ आणि आशुतोष बापट लिखित ‘साद मंदिरांची, ओळख संस्कृतीची’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रवींद्र घाटपांडे म्हणाले, प्रकाश देशपांडे हे चिपळूणचे सांस्कृतिक वैभव आहेत. चिपळूणला जाऊन त्यांना भेटलो नाही, तर आपण चिपळूण पाहिले असे म्हणता येत नाही. त्यांच्या दीर्घ साहित्य–सांस्कृतिक योगदानाचा सन्मान म्हणून पुरस्कार समितीने एकमताने त्यांची निवड केली.
माधव भांडारी यांनी प्रकाश देशपांडे यांच्याशी असलेल्या पंचावन्न वर्षांच्या मैत्रीचा उल्लेख केला. ते म्हणाले, “एका संस्थेचे सलग छत्तीस वर्षे कार्याध्यक्ष राहणे हे जितके विलक्षण, तितकेच पंचाहत्तराव्या वर्षी एका क्षणात पद सोडणे हे प्रेरणादायी आहे. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या १६० वर्षांच्या प्रवासात आणि श्रीकृष्ण व्याख्यानमालेच्या शतकी वाटचालीत देशपांडे यांचा मोलाचा वाटा आहे.”
देशपांडे यांच्या पत्नी डॉ. रेखा देशपांडे यांच्या शैक्षणिक व साहित्यिक योगदानाचा आणि प्रकाश देशपांडे यांच्या कार्यात त्यांनी दिलेल्या अखंड साथीचा मान्यवरांनी गौरवपूर्वक उल्लेख केला.
आशुतोष बापट म्हणाले, प्रकाश देशपांडे म्हणजे कोकणचे ‘गुगल’ आहेत. त्यांच्याशी स्नेह असणे म्हणजे भाग्ययोग आहे.
पुरस्कार स्वीकारताना प्रकाश देशपांडे यांनी आपल्या साहित्यिक प्रवासामागील प्रेरणा आणि सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. त्यांनी कृतज्ञतेने स्नेहांजली पुरस्कार स्वीकारत पुरस्काराची रक्कम ‘कौशिकाश्रम’ संस्थेला दान म्हणून सुपूर्द केली.
कार्यक्रमाला पुण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते. त्यात पांडुरंग बलकवडे, प्रा. प्र. के. घाणेकर, डॉ. मुकुंद दातार, अभय भांडारी, अभिजित जोग, महेश तेंडुलकर, स्मिता व मोहनराव घैसास, डॉ. संगीता बर्वे, गणेश कळसकर, सौरभ कर्डे आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शाम भुरके यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी