पुणे, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवल्याप्रकरणी कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत चार गुन्हे दाखल झाले असून, बनावट पारपत्र मिळवून तो युरोपात गेल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे.
याप्रकरणी नीलेश बन्सीलाल घायवळ (४९, रा. संत ज्ञानेश्वर काॅलनी, शास्त्रीनगर, कोथरूड), तसेच त्याला बनावट पारपत्र काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक माेहन जाधव यांनी कोथरूड पोलिसांत फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक माने तपास करत आहेत.
कोथरूड भागात एका तरुणावर गोळीबार प्रकरणात घायवळसह साथीदारांविरुद्ध मोक्का लागू करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. तो ९० दिवसांच्या व्हिसावर स्वित्झर्लंडला गेल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगरमधून त्याने ‘तत्काळ’ पारपत्र मिळविले आहे. त्याचा तपास पुणे पोलिसांकडून करण्यात आला. घायवळला अटक करण्यासाठी पोलिसांनी लूक आऊट नोटीस बजावली आहे.
कोथरूड पोलिसांनी घायवळचे घर आणि कार्यालयाची झडती घेऊन दोन काडतुसे, चार पुंगळ्या जप्त केल्या. याशिवाय धाराशिव, पुणे, मुळशी, जामखेड येथील जमिनीसंदर्भातील खरेदीखत, साठेखतासह अन्य कागदपत्रे, तसेच दहा तोळे सोन्याचे दागिनेही जप्त केले आहेत. याप्रकरणी घायवळविरुद्ध शस्त्र अधिनियम १९५१ चे कलम ५, ७, २५ (१), २७ (२) अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु