पुणे, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)।केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात पुणे मेट्रो राज्यात अव्वल ठरली आहे. आतापर्यंत सुमारे ७३.७५ टक्क्यांपर्यंत डिजिटल व्यवहार केल्याचे आकडेवारीतून समोर आले. त्यामुळे स्मार्ट पुणेकरांची स्मार्ट दिशेने वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) पुण्यातील मेट्रो मार्गिका विस्ताराबरोबर प्रवाशांना पायाभूत आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात प्रवाशांना कागदी व्यवहारांना दूर ठेवून (रोख व्यवहार) ‘आपली मेट्रो’ मोबाइल ॲप, क्यूआर कोड स्कॅनर, यूपीआय, महामेट्रो कार्ड, व्हाॅट्सॲप आणि किऑस्क अशा डिजिटल माध्यमांची सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर स्थानकांवर तिकीट केंद्र निर्माण करून थेट मशिनच्या माध्यमातून थेट रोखीने व्यवहाराची सुविधाही निर्माण केली आहे. मात्र, प्रवाशांकडून डिजिटल व्यवहारांना पसंती दिली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु