देशोदेशीच्या प्रतिनिधींनी दिली ठाणे महापालिकेस भेट
ठाणे, 8 ऑक्टोबर, (हिं.स.) : स्थानिक स्वराज्य संस्थाची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी मुंबई-ठाण्याच्या दौऱ्यावर असलेल्या २२ देशांतील प्रतिनिधींनी बुधवारी ठाणे महापालिका मुख्यालयास भेट दिली. त्यानंतर त्यांनी मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, छत्
ठाणे


ठाणे, 8 ऑक्टोबर, (हिं.स.) : स्थानिक स्वराज्य संस्थाची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी मुंबई-ठाण्याच्या दौऱ्यावर असलेल्या २२ देशांतील प्रतिनिधींनी बुधवारी ठाणे महापालिका मुख्यालयास भेट दिली. त्यानंतर त्यांनी मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय यांचीही पाहणी करून तेथील कार्यपद्धती जाणून घेतली.

परराष्ट्र मंत्रालयाच्या भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य कार्यक्रमाच्या अंतर्गत समाजसेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी समाज विकास प्रशासन अभ्यासक्रम चालवण्यात येतो. सामाजिक क्षेत्रांतील सेवा, त्याची धोरण निश्चिती याबद्दल अभ्यासक्रमात मार्गदर्शन करण्यात येते. २३ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर या काळात होत असलेल्या या अभ्यासक्रमासाठी २२ देशातील २८ प्रतिनिधी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत (टीस)मध्ये दाखल झाले आहेत. हे प्रतिनिधी त्यांच्या देशात सरकारी किंवा निमसरकारी आस्थापनांशी निगिडत आहेत.

या प्रतिनिधींनी बुधवारी ठाणे महापालिका मुख्यालय येथे महापालिकेची कार्यपद्धती जाणून घेतली. उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे आणि उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी यांनी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात या प्रतिनिधींशी संवाद साधला. ठाणे शहराची रचना, पार्श्वभूमी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन, तसेच, महापालिकेच्या कामाचे स्वरूप यांची माहिती दिली. त्यावेळी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यंवंशी आणि माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर उपस्थित होते.

मुख्यालयात, सध्या सुरू असलेल्या मराठी ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीच्या निमित्ताने या प्रतिनिधींना अभिजात मराठी भाषेविषयीही अवगत करून देण्यात आले. त्यानंतर, या प्रतिनिधींनी ठाणे महापालिकेच्या महासभा होत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची पाहणी केली. तसेच, खोपट येथील सौ. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था आणि कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय यांनाही त्यांनी भेट दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande