नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर (हिं.स.) : छत्तीसगडमधील गाजलेल्या महादेव बेटिंग ऍप प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यामध्ये सर्व 12 आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी गेल्या अडीच वर्षांपासून रायपूरच्या कारागृहात बंद होते.
न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने ही सुनावणी करताना भीम सिंह यादव, अर्जुन यादव, चंद्रभूषण वर्मा, सतीश चंद्राकर यांच्यासह सर्व 12 आरोपींना जामीन मंजूर केला.
महादेव ऑनलाइन बेटिंग प्रकरणातील ही मोठी कारवाई मानली जात आहे. यासंदर्भातील माहितीनुसार, 2016 मध्ये सौरभ चंद्राकर, रवि उप्पल आणि अतुल अग्रवाल यांनी महादेव बुक अॅपची सुरुवात केली होती. हळूहळू हे ऍप ऑनलाइन सट्टेबाजीसाठीचे सर्वात मोठे नेटवर्क बनले.या ऍपच्या माध्यमातून क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन यांसारख्या खेळांवर सट्टेबाजी केली जात होती. हे ऍप दुबईहून चालवले जात होते आणि पुढे याच ऍपच्या माध्यमातून जुगार व मनी लॉन्ड्रिंग (काळा पैसा पांढरा करण्याचे) प्रकार सुरू झाले.सुरुवातीला संथ गतीने सुरू झालेल्या या ऍपने 2020 मध्ये वेग पकडला. याच काळात ऍपच्या संचालकांनी हैदराबादमधील रेड्डी अन्ना नावाच्या एका दुसऱ्या सट्टेबाजी प्लॅटफॉर्मला सुमारे 1000 कोटी रुपयांना विकत घेतले. त्यानंतर या ऍपचा यूजर बेस 50 लाखांहून अधिक झाला. आणि दररोजची कमाई सुमारे 200 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती.
-------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी