सोलापूर, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) घातलेल्या निर्बंधांमुळे ठेवीदारांमध्ये आज मोठी खळबळ उडाली आहे. सकाळपासूनच बँकेसमोर मोठी गर्दी जमली असून ठेवीदारांना आपली ठेव परत मिळावी यासाठी गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर बँकेत पैसे अडकल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
आरबीआयच्या आदेशानंतर समर्थ बँकेतील कोणतीही ठेव काढता येणार नाही, असे बँक कर्मचाऱ्यांनी ठेवीदारांना सांगितल्यावर ठेवीदारांचा संताप अनावर झाला. आम्हाला आमचे पैसे द्या, नाहीतर बँकेत तोडफोड करू, अशा आक्रोशात काही ठेवीदारांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. अनेक ठेवीदारांनी बँकेसमोरच आंदोलन सुरू केले.
बँक कर्मचाऱ्यांनी ठेवीदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणतीही ठोस हमी न मिळाल्याने नागरिक संतप्त झाले. मागच्या हंगामातील उसाचे पैसे नुकतेच खात्यात आले होते. आता तेच अडकले आहेत. घर चालवायचे कसे?, अशी हताश प्रतिक्रिया एका शेतकरी ठेवीदाराने दिली. काही ठेवीदारांनी औषधी, रुग्णालयाचे बिल, मुलांचे शिक्षण आणि घरखर्च या सर्वांसाठी बँकेतील रकमेवर अवलंबून असल्याचे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड