नंदुरबार, 8 ऑक्टोबर (हिं.स.) | राज्यातील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी सन 2024 या कॅलेंडर वर्षातया कालावधीत मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या ग्रंथांची शासनमान्य ग्रंथांच्या यादीत समावेश करण्यासाठी 15 ऑक्टोंबर, 2025 पर्यंत ग्रंथ पाठवावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध. बा. वळवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
राज्यातील ग्रंथालयांना मराठी भाषेतील प्रकाशित ग्रंथांची माहिती मिळावी व त्यांना खरेदीसाठी मार्गदर्शक ठरावे, या उद्देशाने ग्रंथ निवड समितीच्या सदस्यांनी शिफारस केलेल्या ग्रंथांची वर्षनिहाय शासनमान्य यादी ग्रंथालय संचालनालयाकडून प्रकाशित केली जाते. यासाठी सन 2024 (1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024)या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेले आणि प्रथम आवृत्ती असलेले मराठी भाषेतील ग्रंथाची एक प्रत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन (टाऊन हॉल), मुंबई 400 001 यांच्याकडे 15 ऑक्टोंबर, 2025
पर्यंत विनामूल्य पाठवायची आहे.
यापूर्वी सन 2024 मध्ये प्रकाशित झालेले ग्रंथ जर संचालनालयास पाठवले असतील, तर ते पुन्हा पाठवण्याची आवश्यकता नाही, याबाबतची माहिती शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in संकेतस्थळांवर उपलब्ध आहे, असेही जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध. बा. वळवी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर