रत्नागिरी, 8 ऑक्टोबर, (हिं. स.) : चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (सीजीपीए)च्या नव्या पदाधिकाऱ्यांचा दिमाखदार पदग्रहण सोहळा हॉटेल अतिथी ग्रँड येथे पार पडला. या सोहळ्यात डॉ. संदीप भागवत यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
संघटनेच्या सेक्रेटरीपदी डॉ. ओंकार बेल्लारीकर, खजिनदारपदी डॉ. अभिजित दुधाळ, तर महिला प्रतिनिधी म्हणून डॉ. स्नेहल जोशी यांची निवड करण्यात आली.
पदग्रहणानंतर डॉ. संदीप भागवत यांनी संघटनेच्या कार्याचे व्यापक उद्दिष्ट मांडले. डॉक्टरांसाठी अद्ययावत उपचार पद्धतीवरील कार्यशाळा घेण्याचा, तसेच चिपळूण व परिसरात आपत्तीच्या प्रसंगी तत्काळ वैद्यकीय मदत पुरविण्यासाठी “डिझास्टर क्विक रिस्पॉन्स टीम” स्थापन करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. संघटनेची ओळख केवळ व्यावसायिक नव्हे, तर समाजोपयोगी उपक्रमांद्वारे घडविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
सेक्रेटरी डॉ. ओंकार बेल्लारीकर यांनी सर्व सदस्यांना संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभागाचे आवाहन केले. खजिनदार डॉ. अभिजित दुधाळ यांनी संघटनेच्या प्रगतीसाठी पूर्ण कटिबद्धतेने काम करण्याचे आश्वासन दिले, तर महिला प्रतिनिधी डॉ. स्नेहल जोशी यांनी महिला डॉक्टरांच्या सहभागाची ग्वाही दिली.
माजी अध्यक्ष डॉ. रणजित पाटील, डॉ. अरुण पाटील आणि डॉ. ऋषिकेश चितळे नव्या कमिटीचे सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. कार्यक्रमात डॉ. मंगेश वाजे यांनी दिवाळीनिमित्त “स्वर संध्या” या सांस्कृतिक कार्यक्रमाची घोषणा केली.
पदग्रहणानंतर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथील प्रसिद्ध ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. मनोज श्रीवास्तव आणि व्हॅस्क्युलर, इंडोव्हॅस्क्युलर सर्जन डॉ. अनिल राणे यांनी मार्गदर्शन केले. गतवर्षीच्या कमिटीचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
सोहळ्याला डॉ. अजित दाभोळकर, डॉ. संतोष दाभोळकर, डॉ. राकेश चाळके, डॉ. सुभाष उतेकर, डॉ. अल्ताफ सरगुरोह, डॉ. कृष्णकांत पाटील, डॉ. विकास मिर्लेकर, डॉ. अनिल शिगवण, डॉ. प्रसाद दळी, डॉ. दीपक विखारे, डॉ. संजय कलगुटकी, डॉ. यतीन मयेकर, तसेच चिपळूण व परिसरातील अनेक डॉक्टर आणि महिला डॉक्टर उपस्थित होते.
चिपळूण होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निरंजन तांबे आणि निमा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चैतन्य खोत यांनीही उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ऋषिकेश चितळे यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी