सोलापूरात काका साठे सुभाष देशमुखांसोबत युती करणार? इकडे हसापुरे म्हणतात मी इच्छुकच नाही
सोलापूर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद ओबीसी सर्वसाधारण झाल्याने सर्वांच्या तोंडून पहिले नाव आले ते म्हणजे सध्या भाजपच्या सोबत असलेले सुरेश हसापुरे यांचे. जिल्हा परिषदेच्या 68 सदस्यांमधून सुमारे 18 जागा या ओबीसी साठी असणार
सोलापूरात काका साठे सुभाष देशमुखांसोबत युती करणार? इकडे हसापुरे म्हणतात मी इच्छुकच नाही


सोलापूर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद ओबीसी सर्वसाधारण झाल्याने सर्वांच्या तोंडून पहिले नाव आले ते म्हणजे सध्या भाजपच्या सोबत असलेले सुरेश हसापुरे यांचे. जिल्हा परिषदेच्या 68 सदस्यांमधून सुमारे 18 जागा या ओबीसी साठी असणार आहेत त्यामध्ये यंदा कोणाच्या नशिबात अध्यक्ष पद लिहिले आहे याची उत्सुकता आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सुमारे 35 ते 40 वर्षे जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले काका साठे हे पुन्हा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जाते. त्यांचा नान्नज जिल्हा परिषद गट जर खुला झाला तर पुन्हा काकाच त्या ठिकाणाहून निवडणूक लढवून जिल्हा परिषदेमध्ये दिसतील यात नवल वाटायला नको.

सध्या उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. पूर्वी काका साठे दिलीप माने एकत्र यायचे, कधी काका साठे शहाजी पवार एकत्र यायचे पण आता दिलीप माने, शहाजी पवार, माजी आमदार यशवंत माने, अविनाश मार्तंडे ही नेते मंडळी एका बाजूला आहेत.

बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान सुभाष देशमुख यांनी काका साठे यांना सोबत घेतले होते. त्यामुळे पुन्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काका साठे हे सुभाष देशमुख यांच्या सोबत युती करण्यास इच्छुक असल्याचे समजले जर पाकणी गटातून मनीष देशमुख उमेदवार राहतील त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपण उचलू असेही काका साठे पत्रकार समोर बोलून गेले. याप्रकरणी सुभाष देशमुख यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande