रायगड, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि समस्या शासन दुर्लक्षित करत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि आदिवासी नेते दिलीप भोईर यांनी सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. अलिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केले की, आदिवासी समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर रस्ते जाम आंदोलन उभारले जाईल.
या पत्रकार परिषदेत त्यांनी एसटी आरक्षणाचा मुद्दा, आदिवासी भागातील मूलभूत सुविधांचा अभाव आणि चुकीच्या जनगणनेमुळे समाजाचे होणारे नुकसान या मुद्यांवर सरकारचे लक्ष वेधले. “आम्ही आदिवासी आरक्षणावर ठाम आहोत. इतर समाजाच्या हक्कांवर आमचा विरोध नाही; मात्र एसटी प्रवर्गातून कोणी आरक्षण मागत असेल, तर यापुढे तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
भोईर यांनी पुढे सांगितले की, आदिवासी, कोळी आणि ठाकूर समाजांना एकत्र आणून मोठे आंदोलन उभारण्याची तयारी सुरू आहे. २०११ नंतरची जनगणना अद्याप प्रसिद्ध न झाल्यामुळे अनेक योजना आणि आरक्षणावर परिणाम होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. “सरकारकडे चुकीची माहिती पोहोचवल्याने आदिवासी समाजाचे नुकसान होत आहे,” असे ते म्हणाले.
डोंगराळ भागात आजही पाणी, रस्ते आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे नमूद करत, भोईर यांनी लोकप्रतिनिधींच्या निष्क्रिय भूमिकेवरही टीका केली. आंदोलनाची रणनीती स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, तालुका स्तरावर लवकरच विचारमंथन बैठक घेण्यात येणार असून, मागण्या न मानल्यास जिल्हास्तरीय बंद आंदोलन अपरिहार्य ठरेल. सरकारने तातडीने निर्णय घेऊन आदिवासी समाजाचा विश्वास संपादन करावा, असे आवाहन दिलीप भोईर यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके