पुणे, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। कोथरूड आणि बावधन परिसरातील उजवी भुसारी कॉलनी, डावी भुसारी कॉलनी, इंदिरा शंकरनगरी, वेदभवन परिसर, सौदामिनी, मोकाटेनगर या भागांतील नागरिकांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होत आहे. दसऱ्यानंतर या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. तो पुन्हा सुरू झाल्यानंतर घरांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे हा त्रास उद्भवत असल्याने महापालिकेने पिण्याचे पाणी वीस मिनिटे उकळून थंड करूनच पिण्याचे तसेच योग्य औषधोपचार घेण्याचे आवाहन केले आहे.
बावधन येथील रहिवासी कुणाल घारे यांनी सांगितले की, ‘अतिसार, उलटी, मळमळ या तक्रारींमध्ये वाढ झाली असून महापालिका दवाखान्यात ५० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.’ तर, ‘भुसारी कॉलनी परिसरात पाणी गढूळ येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती. परंतु, त्याकडे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे,’ असा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य व पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भुसारी कॉलनी परिसरात ठिकठिकाणी पाहणी केली. तसेच, पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठविले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु