सोलापूर, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राज्यातील साखर कारखान्यांनी मदतीसाठी एक पाऊल पुढे यावे, तसेच कारखान्यांनी आपल्या नफ्यातून प्रती टन 15 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचे आवाहन केले आहे. लवकरच तसा शासन अध्यादेश निघण्याची शक्यता आहे. शासन निर्णय झाल्यास सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुमारे 15 कोटी जमा होणार आहेत. एकावेळी 15 कोटींचा सर्वाधिक निधी जिल्हातील साखर उद्योगाच्या माध्यमातून सरकारला मिळणार आहे.
राज्यात सर्वाधिक ऊस आणि साखर कारखाने अशी सोलापूरची ओळखी आहे. जिल्ह्यातील 37 साखर कारखान्यांचे मोठी जाळे आहे. मागील वर्षीच्या गाळप हंगाम ( 2024-2025)30 ते 32 कारखान्यांनी जवळपास 100 लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. त्यानुसार प्रती टन 5 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी व 10 रुपये पूरग्रस्तांसाठी असे एकूण 15 रुपये कपात केले जाणार आहेत. यातून सुमारे 15 कोटी रुपयांची घसघसीत रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा होणार आहे. दरम्यान सरकारच्या या निर्णायाला स्वाभीमीनी शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी नेत्यांनी विरोध केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड