अकोला, 9 ऑक्टोबर (हिं.स.) : आंतरशालेय कुस्ती स्पर्धानिमित्त आलेल्या कुस्तीपटू शालेय विद्यार्थ्याचे वजन करतानाचे अवस्थेतील व्हिडिओ फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अकोट फाईल येथील रहिवासी असलेल्या कुस्ती प्रशिक्षक कुणाल माधवे विरुद्ध खदान पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला. याप्रकरणाने आंतरशालेय कुस्ती स्पर्धेला गालबोट लागले आहे.
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, 6 आणि 7 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय अकोलाच्या वतीने आंतरशालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन स्थानिक नीमवाडी येथील पोलीस हॉल येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शाळेतील कुस्तीपटू सहभागी झाले होते. यावेळी अनेक प्रशिक्षक सुद्धा याठिकाणी हजर होते. स्पर्धा नियमानुसार सहभागी खेळाडूंचे वजन करणे आदी सर्व बाबी पार पडत होत्या. यावेळी एक चौदा वर्षीय मुलगा वजन करण्याकरिता आला असता, त्याचे वस्त्र रहित अवस्थेतील व्हिडिओ चित्रीकरण तेथे उपस्थित असलेला प्रशिक्षक कुणाल माधवे याने केले असल्याचा आरोप कुस्तीपटू विद्यार्थ्याच्या वडिलांनी फिर्यादीत केला आहे. यावेळी आरोपी प्रशिक्षक एवढ्यावरच न थांबता त्याने फिर्यादी यांचे सोबत अर्वाच्य भाषेत बोलत सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या आणि काही वेळातच सदर फोटो हे व्हायरल सुद्धा केले. परिणामी चौदा वर्षीय विद्यार्थ्याची बदनामी झाली असून तो प्रचंड मानसिक दबावाखाली असल्याचे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. पालकांनी त्यावेळी हा संपूर्ण प्रकार कुस्ती संघटनेचे पदाधिकारी यांच्या कानावर टाकला असल्याचे तक्रारीत नमूद केलेले आहे.
या सर्व प्रकरणी खदान पोलिसांनी आरोपी कुणाल माधवे याच्याविरुद्ध बीएनएस २९६, ३५१(२), माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६७ (बी) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे