गुवाहटी, 09 ऑक्टोबर (हिं.स.) : आसाममध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजेन गोहेन यांच्यासह एकूण 18 नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी ही पक्षासाठी मोठी चिंता निर्माण करणारी घटना आहे. राजेन गोहेन यांनी आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप सैकिया यांच्याकडे सादर केला आहे.
राजेन गोहेन हे 4 वेळा खासदार राहिले असून 2016 ते 2019 या कालावधीत रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. पक्षात असताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारीही सांभाळली होती. ते व्यवसायाने चहा बागांचे मालक असून, राज्यातील विविध भागांत त्यांचा चांगला प्रभाव आहे. त्यांच्या पक्षत्यागामुळे भाजपला राज्यात राजकीय तोटा होण्याची शक्यता आहे.
गोहेन यांनी सांगितले की, त्यांनी राजीनामा दिला कारण भाजपने असमच्या जनतेला दिलेले वचन पूर्ण केले नाही आणि स्थानिक समुदायांची फसवणूक केली आहे, तर बाहेरील लोकांना राज्यात वसण्याची परवानगी दिली. या कारणामुळे त्यांनी आणि अन्य १७ नेत्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीनामा देणारे बहुतेक नेते ऊपरी आणि मध्य असममधील आहेत. यामध्ये काही महत्त्वाच्या स्थानिक नेत्यांचाही समावेश आहे, जे स्थानिक पातळीवर प्रभावी मानले जातात.
राजकीय परिणाम काय ?
सध्या असममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. आगामी 2026च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, राजेन गोहेन यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा आणि त्यांच्या समर्थकांचा पक्षत्याग भाजपसाठी एक गंभीर आव्हान ठरू शकतो.
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी