जळगाव, 9 ऑक्टोबर, (हिं.स.) बोगस कॉल सेंटर चालविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या माजी महापौर ललित कोल्हेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.दरम्यान, जळगाव कारागृहात पुरेशी जागा नसल्याच्या कारणावरून कोल्हे यांची थेट नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून, त्यापैकी ८ जणांना अटक करण्यात आली आहे, तर तीन मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहेत.
याबाबत असे की, २८ सप्टेंबरला जळगाव शहरातील ममुराबाद रस्त्यावरील एल.के. फार्म येथे सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटर वर पोलिसांनी छापेमारी केली. यावेळी त्या ठिकाणी ३१ लॅपटॉप आणि कॉल सेंटरची आधुनिक यंत्रणा आढळून आली. याप्रकरणात पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत सदरचे कॉल सेंटर खास करून विदेशी लोकांची फसवणूक करण्यासाठी सुरू केल्याचे स्पष्ट झाले. कॉल सेंटरमधील कर्मचारी स्वतःला अधिकृत एजंट असल्याचे सांगून डेटा चेक करण्याच्या बहाण्याने किंवा इतर आकर्षक आमिषे दाखवून परदेशी नागरिकांना गंडवित होते. दोन लॅपटॉपवर पैशांचे व्यवहारही झाल्याचे पोलिसांना आढळून आले होते.ऑनलाईन फसवणुकीच्या उद्देशाने बोगस कॉल सेंटर चालविल्याच्या आरोपावरून पोलिसांनी माजी महापौर कोल्हे आणि इतर संशयितांच्या विरोधात संघटित गुन्हेगारीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांर्तगत गुन्हा दाखल केला आहे. सर्व संशयितांना न्यायालयाने यापूर्वी बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्या कोठडीची मुदत संपल्यानंतर कोल्हे यांच्यासह अन्य संशयिताला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान जळगाव कारागृहात पुरेशी जागा नसल्याचे कारण देत ललित कोल्हे यांची थेट नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात नंतर कोल्हे यांना नाशिक नेण्यात आले. या प्रकरणात ऋषी बेरिया, अकबर खान आणि आदिल सय्यद हे तीन प्रमुख सूत्रधार अद्याप फरार असून, ते विदेशात पलायन करू नयेत म्हणून लूकआउट नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर