जळगाव, 9 ऑक्टोबर (हिं.स.) कॉफी शॉपच्या नावाखाली सुरू असलेल्या कॅफेमध्ये तरुण-तरुणींचे अश्लील चाळे सुरू असलेल्या दुकानावर रामानंद नगर पोलिसांनी छापा टाकला. दरम्यान, पोलिसांनी कॉफी शॉपमधील काही जागेची व डस्टबिनची पाहणी केली असता, त्यात निरोध सापडले. तसेच कॉफी शॉपचा परवानादेखील लावलेला नव्हता. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांत कॅफे चालविणारा मयूर धोंड्डू राठोड (२५, रा. कोल्हे हिल्स) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोल्ड जीमच्या पुढे काही अंतरावर चॅट अड्डा नावाने एका गाळ्यात प्लायवूडचे कंपार्टमेंट तयार केले आहे. या ठिकाणी तरुण-तरुणींचे अश्लील चाळे सुरू असतात व त्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याची माहिती रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली. पोलिस निरीक्षकांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुधाकर अंभोरे, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी व योगेश बारी यांनी कॉफी शॉपवर छापा टाकला. या कॅफेमध्ये काही तरुण-तरुणी अश्लील चाळे करताना आढळले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली व समज देऊन सोडले.पोलिसांनी कॉफी शॉपमधील काही जागेची व डस्टबिनची पाहणी केली असता, त्यात निरोध सापडले. तसेच कॉफी शॉपचा परवानादेखील लावलेला नव्हता. याप्रकरणी मयूर राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर