आणिबाणीतील लोकशाही रक्षकांचा केला सत्कार
लखनऊ, 09 ऑक्टोबर (हिं.स.) : एका व्यक्तिच्या स्वार्थासाठी लावण्यात आलेली आणिबाणी म्हणजे लोकशाहीची गळचेपी होता. त्याकाळात नागरिकांचे मलभूत अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली करण्यात आल्याचे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रा बृजेश पाठक यांनी केले. लखनऊ विद्यापीठाच्या मालवीय सभागृहात हिंदुस्थान समाचार या बहुभाषिक वृत्तसंस्थेने आयोजित केलेल्या ‘आणिबाणीच्या 50 वर्षांनंतर’ या कार्यक्रमात पाठक बोलत होते. या वेळी ‘युगवार्ता’ आणि ‘नवोत्थान’ या विशेषांकांचे प्रकाशनही करण्यात आले.
या कार्यक्रमाला हिंदुस्थान समाचारचे अध्यक्ष अरविंद मार्डीकर, राजेंद्र सक्सेना, स्वामी मुरारीदास, प्रशांत भाटिया, हरीश श्रीवास्तव, अवनीश त्यागी, मनीष शुक्ला, आनंद दुबे, डॉ. हरनाम सिंह आणि अनिल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पाठक यांनी सांगितले की, आणिबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांचे गळा आवळण्यात आले. अत्याचारांची परिसीमा झाली होती आणि सामान्य जनतेला बोलण्यास किंवा मुक्तपणे फिरण्यासही परवानगी नव्हती. तत्कालीन काँग्रेस सरकारने लोकशाहीला कठपुतळी बनवत राष्ट्रपतींच्या स्वाक्षऱ्या जबरदस्तीने घेतल्या. “आज जे लोक संविधानाच्या प्रती घेऊन फिरतात, तेच त्या काळात संविधानाच्या हत्येस जबाबदार होते,” असे ते म्हणाले. आज भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. भाजप हा ‘मतांची राजकारण’ न करता ‘राष्ट्रप्रथम’ या तत्त्वावर कार्य करणारा पक्ष आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांनी सांगितले की, आपत्कालात ज्या धाडसाने लोकशाही रक्षकांनी संविधानाचे रक्षण केले, त्याचाच परिणाम म्हणून आज देशात लोकशाही व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य जिवंत आहे. आपत्काल हा भारतीय राजकारणाच्या इतिहासातील एक अमिट काळा डाग असल्याचेही त्यांनी नमूद केले.
माजी मंत्री सुरेश राणा म्हणाले की, “तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केवळ स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी संपूर्ण देशावर आपत्काल लादला.” “ज्या देशातील तरुणांनी स्वातंत्र्यासाठी हसत हसत फाशी पत्करली, त्या देशाच्या स्वातंत्र्याची सत्ता टिकवण्यासाठी पायमल्ली झाली,” असे ते म्हणाले. तरुणांनी त्या ऐतिहासिक लढ्याची माहिती घेतली पाहिजे आणि ती लढाई पुढे नेली पाहिजे, असा त्यांनी आग्रह धरला.
या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी 11 लोकशाही रक्षकांचा अंगवस्त्र, शंख आणि प्रशस्तिपत्र देऊन सन्मान केला. सन्मानित झालेल्यांमध्ये भारत दीक्षित, राजेंद्र तिवारी, मनीराम पाल, भानुप्रताप, गंगाप्रसाद, रमाशंकर त्रिपाठी, दिनेश प्रताप सिंह, दिनेश अग्निहोत्री, अजीत सिंह, विश्राम सागर आणि सुरेश रजवानी यांचा समावेश होता. लखनऊच्या महापौर सुषमा खर्कवाल म्हणाल्या की, “आपत्कालाचे दुःख आम्ही आमच्या वडिलधाऱ्यांकडून ऐकले आहे. त्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतनसुद्धा रोखण्यात आले होते.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमित कुशवाहा यांनी केले.------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी