भारत-ब्रिटन वाढत्या भागीदारीतून एका उज्ज्वल भविष्याची निर्मिती करु - पंतप्रधान मोदी
मुंबई, 9 ऑक्टोबर (हिं.स.) - भारत आणि ब्रिटन नैसर्गिक भागीदार आहेत. आमच्या संबंधांच्या पायाअंतर्गत लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य
पंतप्रधान मोदी ब्रिटन पंतप्रधान कीर स्टार्मर


पंतप्रधान मोदी ब्रिटन पंतप्रधान कीर स्टार्मर


पंतप्रधान मोदी ब्रिटन पंतप्रधान कीर स्टार्मर


मुंबई, 9 ऑक्टोबर (हिं.स.) - भारत आणि ब्रिटन नैसर्गिक भागीदार आहेत. आमच्या संबंधांच्या पायाअंतर्गत लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य यांसारख्या मूल्यांवरचा परस्पर सामायिक विश्वास आहे. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात, भारत आणि ब्रिटन दरम्यानची ही वाढती भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा एक महत्त्वाचा आधार ठरली आहे. संरक्षण आणि सुरक्षिततेपासून शिक्षण आणि नवोन्मेषापर्यंत प्रत्येक बाबतीत भारत आणि युके यांच्या दरम्यानच्या संबंधांमध्ये नवे पैलू जोडले जात आहेत, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ते ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या पहिल्या भारत दौऱ्यानिमित्त आज, गुरुवारी मुंबईत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.

मोदी म्हणाले, पंतप्रधान कीर स्मार्टर यांचे मुंबईत स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. आजच्या बैठकीत आम्ही भारत-प्रशांत क्षेत्र, पश्चिम आशिया क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य, युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावरही विचारांची देवाणघेवाण केली. युक्रेन संघर्ष आणि गाझाच्या मुद्द्यावर, भारत संवाद आणि मुत्सद्देगिरीने शांतता पूनर्स्थापित करण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांचे समर्थन करतो. भारत-प्रशांत क्षेत्रात सागरी सुरक्षा विषयक सहकार्य वाढवण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. भारत आणि ब्रिटन दरम्यान तंत्रज्ञान विषयक भागीदारीत अमर्याद क्षमता आहे. आम्ही ब्रिटनची औद्योगिक तज्ञता, संशोधन आणि विकास याला भारताची प्रतिभा आणि व्याप्तीशी जोडण्यावर काम करत आहोत.

पंतप्रधान स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली, भारत आणि ब्रिटनमधील संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली आहे. या वर्षी जुलैमध्ये माझ्या ब्रिटन दौऱ्यादरम्यान, आम्ही ऐतिहासिक सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारावर (सीईटीए) सहमती दर्शविली. या करारामुळे दोन्ही देशांच्या आयात खर्चात कपात होईल, युवा वर्गासाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, व्यापार वाढेल, आणि याचा लाभ आपल्या उद्योग क्षेत्र तसेच ग्राहक, या दोघांनाही मिळेल.

करार झाल्यानंतर काही महिन्यांतच आपला हा भारत दौरा, आणि आपल्यासोबत आलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे व्यावसायिक प्रतिनिधी मंडळ, हे भारत आणि ब्रिटनमधील भागीदारीत आलेली नवी ऊर्जा आणि व्यापक दृष्टी यांचे प्रतीक आहे. काल भारत आणि ब्रिटन दरम्यान उद्योग जगतातील आघाडीच्या व्यक्तिमत्वांची सर्वात मोठी शिखर परिषद झाली. आज आपण भारत आणि ब्रिटन मुख्य कार्यकारी अधिकारी मंच आणि जागतिक फिनटेक महोत्सव यांनाही संबोधित करणार आहोत. या सगळ्यामुळे भारत आणि ब्रिटनमधील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी अनेक सूचना आणि नवीन शक्यता समोर येतील.

गेल्या वर्षी आम्ही भारत-ब्रिटन तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमाचा प्रारंभ केला. या अंतर्गत आम्ही अत्यावश्यक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये संयुक्त संशोधन आणि नवोन्मेषासाठी एक मजबूत मंच तयार केला आहे. दोन्ही देशांतील युवा पिढीला नवोन्मेषाच्या दुव्यासोबत जोडण्यासाठी आम्ही, संपर्क जोडणी आणि नवोन्मेष केंद्र, संयुक्त कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन केंद्र यांसारखी अनेक पाऊले उचलली आहेत.

आम्ही महत्त्वपूर्ण खनिजांसंदर्भात सहयोगासाठी एक उद्योग संघ तसेच पुरवठा साखळी निरीक्षक यंत्रणेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा ‘सॅटेलाईट कँपस’ आयएसएम धनबाद येथे असेल. शाश्वत विकास ध्येयांप्रती आमची सामायिक कटिबद्धता आहे. या दृष्टीने आम्ही भारत-युके ऑफशोअर विंड टास्कफोर्सच्या स्थापनेचे स्वागत करतो. आम्ही हवामान विषयक तंत्रज्ञान स्टार्टअप निधीची स्थापना केली आहे. यातून हवामान, तंत्रज्ञान आणि कृत्रिम तंत्रज्ञान या संदर्भात काम करणारे दोन्ही देशांचे नवोन्मेषकर्ते आणि उद्योजक अधिक सक्षम होतील.

आज पंतप्रधान स्टार्मर यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि प्रभावी प्रतिनिधीमंडळ आपल्याकडे आले आहे. युकेमधील नऊ विद्यापीठे भारतात त्यांच्या शिक्षणसंस्था सुरु करत आहेत ही अत्यंत आनंदाची बाब आहे.साऊदम्टन विद्यापीठाच्या गुरूग्राम परिसराचे नुकतेच उद्घाटन झाले आहे आणि विद्यार्थ्यांच्या पहिल्या गटाने तेथे प्रवेश देखील घेतला आहे. त्यासोबतच, गिफ्ट सिटीमध्ये युकेच्या तीन इतर विद्यापीठांच्या संस्थांच्या उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे.

आमच्या दरम्यान संरक्षण विषयक सहकार्यात देखील वाढ झाली आहे. आम्ही संरक्षण संबंधित सह-उत्पादनाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांना एकमेकांशी जोडत आहोत. संरक्षण विषयक सहकार्यात एक पाऊल पुढे टाकत आम्ही लष्करी प्रशिक्षणाच्या संदर्भात सह्योगाबाबत सामंजस्य करार केला आहे.याच्या अंतर्गत, भारतीय वायुसेनेचे उड्डाण मार्गदर्शक युकेच्या रॉयल एअर फोर्समध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतील.

एकीकडे देशाच्या आर्थिक राजधानीत म्हणजेच मुंबईत ही बैठक होत आहे आणि दुसरीकडे आमच्या नौदलांची जहाजे “कोंकण 2025” हा संयुक्त सराव करत आहेत हा एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण योगायोग आहे. युकेमध्ये स्थायिक झालेले 1.8 दशलक्ष भारतीय आमच्या भागीदारीचा जिवंत दुवा आहेत. त्यांनी ब्रिटीश समाज आणि अर्थव्यवस्थेत स्वतःचे मौलिक योगदान देऊन दोन्ही देशांदरम्यान मैत्री, सहयोग आणि विकासाच्या सेतूला बळकटी दिली आहे.

भारताची गतिशीलता आणि युकेची तज्ञता मिळून एक अनोखा सुसंवाद निर्माण होतो. आमची भागीदारी विश्वसनीय आहे, प्रतिभा आणि तंत्रज्ञानाच्या प्रेरक शक्तीने युक्त आहे. आज जेव्हा मी आणि पंतप्रधान स्टार्मर या व्यासपीठावर एकमेकांसोबत उभे असताना आमची ही सुस्पष्ट बांधिलकी व्यक्त करतो की आम्ही एकत्रित येऊन, दोन्ही देशांच्या लोकांसाठी एका उज्ज्वल भविष्याची निर्मिती करु, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande