हुबळी, 09 ऑक्टोबर (हिं.स.) : कर्नाटकच्या हुबळी येथे एका सरकारी कार्यक्रमादरम्यान कुरआनचे पठण झाल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अरविंद बेलाड यांनी या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवला असून, सरकारी व्यासपीठाचा गैरवापर झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बेलाड कार्यक्रमाच्या पद्धतीवर टीका करताना म्हणाले की, काँग्रेस नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी हा सरकारी कार्यक्रम एक पक्षीय शोमध्ये रूपांतरित केला.सरकारी व्यासपीठावर कुरआनचे पठण आणि अधिकाऱ्यांचे पक्ष कार्यकर्त्यांसारखे वर्तन हे प्रशासनिक प्रोटोकॉलचे खुले उल्लंघन आहे, असे ते म्हणाले.एचडीएमसी कमिश्नर रुद्रेश घाली आणि जिल्हा परिषद सीईओ भुवनेश पाटील यांचा उल्लेख करत बेलाड म्हणाले की, हे अधिकारी सरकारी नियम लागू करण्याऐवजी कार्यक्रमात पक्षाच्या पाहुण्यांसारखे सहभागी झाले. याप्रकरणी अरविंद बेलाड यांनी या प्रकरणी मुख्य सचिवांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. जर सरकारने या प्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही, तर ते हा मुद्दा आगामी विधानसभा अधिवेशनात उपस्थित करण्याचा इशारा त्यांनी दिलाय.
कार्यक्रमाचे स्वरूप काय होते?
हा कार्यक्रम लाभार्थ्यांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्यासाठी आणि देवर गुडीहाल रोडवरील विकास कामांच्या उद्घाटनासाठी आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमात श्रम व जिल्हा प्रभारी मंत्री संतोष लाड यांनी विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. सुमारे 14 कोटी रुपयांच्या योजनांची घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली.परंतु या कार्यक्रमादरम्यान कुरआन पठण करण्यात आल्यामुळे भाजपने यावर तीव्र आक्षेप घेत सरकारवर टीका केली आहे.
---------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी