मानसिक आजारपण - आव्हाने आणि समाजाची जबाबदारी
* जगातील एक अब्जाहून अधिक लोकांचा समावेश जगभरात दरवर्षी १० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ मानसिक आजारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी नसून, मानसिक आरोग्याला समाजात प्राथमिकता देण्याचा एक व्यापक प्र
मानसिक आरोग्य


जागतिक मानसिक आरोग्य दिन


* जगातील एक अब्जाहून अधिक लोकांचा समावेश

जगभरात दरवर्षी १० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ मानसिक आजारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी नसून, मानसिक आरोग्याला समाजात प्राथमिकता देण्याचा एक व्यापक प्रयत्न आहे. आधुनिक जगातील दैनंदिन ताणतणाव, सामाजिक स्पर्धा, आर्थिक अस्थिरता आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढलेल्या संवादाच्या पद्धतींमुळे मानसिक आरोग्याची स्थिती गंभीर होत चालली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) २०२५ मध्ये प्रकाशित ‘World Mental Health Today’ अहवालानुसार, जगभरात सुमारे एक अब्जाहून अधिक लोक मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत. ही आकडेवारी केवळ संख्यात्मक तथ्य नाही, तर ही मानवतेसमोरील गंभीर आव्हाने आणि मानसिक आरोग्य सेवांमध्ये असलेल्या अंतराचे स्पष्ट प्रमाण आहे.

मानसिक आरोग्य समस्या ही केवळ रुग्णालयात उपचार घेण्याच्या गरजेपुरती मर्यादित नसून, ती व्यक्तीच्या संपूर्ण जीवनशैलीशी संबंधित आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या मानसिक आरोग्याच्या व्याख्येनुसार “मानसिक आरोग्य ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये व्यक्ती आपल्यातील क्षमता ओळखून तिचा व्यवस्थित उपयोग करू शकते, तसेच जीवनातील ताणतणावास सामोरे जाण्यास मानसिक आरोग्य सक्षम स्थिती आहे, मानसिक सुदृढ व्यक्ती उत्पादकपणे कार्य करू शकते आणि समाजासाठी योगदान देऊ शकते.” म्हणजेच मानसिक आरोग्याचा अर्थ केवळ मानसिक आजार नसणे नव्हे, तर जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता, समाजात सक्रिय सहभाग, आणि आत्मस्वीकृती यासह व्यक्तीची पूर्ण मानसिक क्षमता आहे.

मानसिक विकार अनेक प्रकारचे असतात, जसे की नैराश्य, चिंता विकार, बायपोलर डिसऑर्डर (द्विध्रुवीय विकार), स्किझोफ्रेनिया (ज्या रोगामध्ये विचार, भावना व कृती यांमध्ये फारकत पडत जाते असा मानसिक रोग), पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (आघातानंतरचा ताण विकार), आणि व्यसनाधीनता या विकारांमुळे केवळ व्यक्तीच नाही तर त्याचे कुटुंब, समाज आणि आर्थिक स्थिती देखील प्रभावित होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, नैराश्य आणि चिंता विकार हे सर्वाधिक सामान्य आहेत, आणि त्यांचा परिणाम दीर्घकाळ टिकतो. मानसिक आजार हे अपंगत्वाचे दुसरे सर्वात मोठे कारण आहेत, ज्यामुळे रोजगार, उत्पन्न आणि सामाजिक सहभागावर प्रतिकूल परिणाम होतो.

जागतिक पातळीवर, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढली तरी, अजूनही अनेक लोकांना योग्य सेवा मिळत नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, मानसिक आरोग्यासाठी जागतिक आरोग्य बजेटचे फक्त २% निधी राखीव आहे, जो आर्थिक दृष्ट्या अत्यल्प आहे. उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये प्रति व्यक्ती ६५ अमेरिकन डॉलर्स इतका खर्च होतो, तर कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये केवळ ०.०४ अमेरिकन डॉलर्स इतका खर्च केला जातो. या सुविधांच्या कमतरतेमुळे सुमारे ८०% मानसिक आजारी लोकांना आवश्यक उपचार मिळत नाहीत.

भारतामध्ये मानसिक आरोग्याचे संकट अधिक गंभीर आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण (NMHS) २०१५–१६ नुसार, भारतात १८ वर्षांवरील १४% लोक मानसिक विकारांनी ग्रस्त आहेत. परंतु, केवळ १०–१२% लोकांनाच उपचार मिळतात. उर्वरित ८८–९०% लोकांना आवश्यक उपचार मिळत नाहीत, ज्यामुळे उपचार दरी अत्यंत मोठी आहे. या सर्वेक्षणानुसार, मानसिक विकारांमध्ये नैराश्य, चिंता विकार, आणि मद्यपान विकार हे सर्वाधिक आढळले. उपचार न मिळण्याची कारणे विविध आहेत, ज्यात सामाजिक कलंक, अज्ञान, आणि उपचारांच्या उपलब्धतेची कमतरता यांचा समावेश होतो. ग्रामीण भागात मानसिक आरोग्य सेवा अजूनही दुर्लभ आहेत. अनेकदा मानसिक विकारांना समाजात भूतबाधा, दैवी शाप, कमजोरी अशा चुकीच्या समजुतींशी जोडले जाते. या अज्ञानामुळे रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचाराऐवजी पारंपारिक उपाय, झाडफुंक, जादूटोणा किंवा धार्मिक मार्गांचा आधार घ्यावा लागतो, ज्यामुळे आजार अधिक तीव्र होतो आणि समाजातून तुटतो.

महिलांचे मानसिक आरोग्य हा विशेष लक्ष देण्यासारखा भाग आहे. कौटुंबिक हिंसा, लैंगिक अत्याचार, सामाजिक असमानता, आणि घरगुती जबाबदाऱ्या यामुळे महिलांमध्ये मानसिक विकारांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत दुप्पट आहे. मातृत्वोत्तर नैराश्य देखील या समस्येचा एक गंभीर भाग आहे. या सर्व कारणांमुळे महिलांच्या मानसिक आरोग्यावर सामाजिक दृष्ट्या गंभीर परिणाम होतो आणि त्यांना उपचार घेण्यास अडचणी येतात. तरुण पिढीमध्ये मानसिक आरोग्याची स्थिती अधिक चिंताजनक आहे. शैक्षणिक दडपण, करिअरची चिंता, कौटुंबिक अपेक्षा, आणि सोशल मीडियावरील तुलना या सर्वांमुळे नैराश्य, चिंता विकार, आणि एकाकीपण यांचे प्रमाण वाढले आहे. भारतात दरवर्षी १३,००० हून अधिक विद्यार्थी आत्महत्या करतात, जी शिक्षण प्रणालीतील गंभीर त्रुटी आणि मानसिक आरोग्याविषयीच्या अज्ञानाचे स्पष्ट उदाहरण आहे.

मानसिक आरोग्य सेवांमध्ये तज्ज्ञांची कमतरता, संसाधनांचा अभाव, आणि समुदाय आधारित सेवा मॉडेल्सची कमतरता यामुळे उपचार घेणे कठीण झाले आहे. भारत सरकारने २०१७ मध्ये मानसिक आरोग्य सेवा कायदा (Mental Healthcare Act) लागू करून मानसिक आरोग्याला कायदेशीर मान्यता दिली आहे. यामध्ये मानसिक आरोग्य सेवा सर्वांसाठी उपलब्ध करणे, रुग्णांच्या अधिकारांचे संरक्षण करणे, आणि मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करणे यांचा समावेश आहे. District Mental Health Programme (DMHP) आणि National Mental Health Programme (NMHP) यांसारख्या कार्यक्रमांद्वारे ग्रामीण व शहरी भागात मानसिक आरोग्य सेवांचे जाळे मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. शाळांमध्ये भावनिक शिक्षण, महाविद्यालयांमध्ये मानसिक आरोग्य क्लब, आणि ग्रामपंचायतींमध्ये समुदाय आधारित समुपदेशन सुरु करणे यामुळे मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढेल. रुग्णांना योग्य उपचार मिळवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि सामाजिक कलंक कमी होईल. व्यक्तिगत पातळीवर मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी योग, ध्यान, विपश्यना, व्यायाम, निसर्गाशी संबंध, संगीत आणि संवाद या सर्व गोष्टी अत्यंत उपयोगी आहेत. भावनिक साक्षरता वाढवणे, आत्मस्वीकृती, आणि सहानुभूती यांचा विकास देखील मानसिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

मानसिक आरोग्य ही केवळ वैयक्तिक समस्या नाही, तर ती सामाजिक, आर्थिक आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) २०२५ मध्ये प्रकाशित ‘World Mental Health Today’ अहवालानुसार, जगातील एक अब्जाहून अधिक लोक मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत, आणि या संख्येत नैराश्य आणि चिंता विकार सर्वाधिक आहेत. या गंभीर समस्येवर उपाय शोधण्यासाठी शासन, समाज, शाळा, महाविद्यालये, कुटुंबे आणि व्यक्तींनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे, उपचारांची उपलब्धता सुनिश्चित करणे, अंधश्रद्धा दूर करणे, आणि सकारात्मक मानसिक आरोग्याचा प्रचार करणे या सर्व गोष्टी आवश्यक पाऊले आहेत.

१० ऑक्टोबर रोजीचा जागतिक मानसिक आरोग्य दिन केवळ औपचारिक दिवस नसून, तो आपल्याला मानसिक आरोग्याच्या गंभीरतेची जाणीव करून देणारा आणि बदलासाठी प्रेरित करणारा दिवस आहे. प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे, आजारांवर लवकर उपचार घेणे आणि समाजातील इतर व्यक्तींना प्रोत्साहन देणे यासाठी सजग राहणे आवश्यक आहे. “मानसिक आरोग्याशिवाय आरोग्य नाही. (There is no health without mental health)” ही (WHO) जागतिक आरोग्य संघटनेची शिकवण आज आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरते.

डॉ. राजेंद्र बगाटे, (लेखक, समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत)

९९६०१०३५८२, bagate.rajendra5@gmail.com

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande