कॅनबेरा / नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर (हिं.स.) - दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत, दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाहीत, तसेच पाणी व रक्त एकत्र वाहू शकत नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने सर्व स्वरुपातील दहशतवादाविरोधात एकत्र यावे, असे आवाहन भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान आज, 9 ऑक्टोबर रोजी कॅनबेरा येथे राजनाथ सिंह आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस यांच्यात व्यापक द्विपक्षीय बैठक झाली. त्याआधी ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक संरक्षण मंत्री पीटर खलील यांनी राजनाथ सिंह यांचे स्वागत केले. तसेच त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ ही देण्यात आले. भारत आणि ऑस्ट्रेलियातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी दोन्ही नेत्यांनी लष्करी सराव, सागरी सुरक्षा, संरक्षण उद्योग सहकार्य तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संयुक्त संशोधनासह अनेक क्षेत्रांमध्ये संरक्षण सहकार्य वाढवण्याप्रती आपापली सामायिक वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली.
यावेळी राजनाथ सिंह यांनी भारत आणि ऑस्ट्रेलियातील संबंधाचा आधार असलेल्या आणि घट्ट रुजलेली सांस्कृतिक संबंध आणि सामायिक लोकशाही ठळकपणे अधोरेखित केली. दोन्ही देशांतील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमुळे परस्परांमधील संरक्षण सहकार्याचा लक्षणीयरीत्या विस्तार झाला झाला असून तो दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांच्या एकूण गतीला पुरक असल्याचा दखलपूर्ण उल्लेखही या बैठकीत केला गेला. या बैठकीदरम्यान माहितीची देवाणघेवाणीशी संबंधित करार, पाणबुड्यांचा शोध आणि बचाव कार्यातील सहकार्याबाबत सामंजस्य करार आणि संयुक्त कर्मचारी चर्चेकरताच्या संदर्भ अटी या संदर्भातील तीन महत्त्वाच्या करारांवरही स्वाक्षरी करण्यात आली.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे देखील काही काळ या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी राजनाथ सिंह यांचे उत्साहाने स्वागत केले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश त्यांना दिला, तसेच मे 2025 मध्ये झालेल्या निवडणुकीत अँथनी अल्बानीज यांनी मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. अँथनी अल्बानीज यांनी नरेंद्र मोदी यांच्या बहुआयामी नेतृत्वाखालील भारताने साधलेल्या उल्लेखनीय आर्थिक प्रगतीची विशेषतः संरक्षण, सायबर सुरक्षा आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील प्रगतीची प्रशंसा केली. कोट्यवधी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यात भारताला मिळालेल्या यशाचेही त्यांनी कौतुक केले तसेच येत्या काळात द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याबद्दलची उत्सुकताही व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी