ओडिशातून अमरावतीत आणला गांजा, तस्करीसाठी बोलेरोला छुपे कप्पे
अमरावती, 1 नोव्हेंबर (हिं.स.) ओडिशा राज्यातून बोलेरो वाहनात गांजा घेऊन अमरावतीत येणाऱ्या दोघांना एलसीबीच्या पथकाने पकडले आहे. तस्करीसाठी वापरलेल्या या वाहनातील टेल लॅम्पच्या आत व खालील बाजूने छुपे कप्पे तयार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आता हा
गांजाच्या तस्करीसाठी बोलेरोला छुपे कप्पे: दोन्ही टेल लॅम्पच्या आत व खालील बाजूने विशेष व्यवस्था, ओडिशातून आणला गांजा‎


अमरावती, 1 नोव्हेंबर (हिं.स.)

ओडिशा राज्यातून बोलेरो वाहनात गांजा घेऊन अमरावतीत येणाऱ्या दोघांना एलसीबीच्या पथकाने पकडले आहे. तस्करीसाठी वापरलेल्या या वाहनातील टेल लॅम्पच्या आत व खालील बाजूने छुपे कप्पे तयार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आता हा गांजा ज्याच्यासाठी अमरावतीत येत होता, त्याचा शोध सुरू केला आहे. ही कारवाई रात्री केली.

रवी रामराव राठोड (३६, रा. भिवापूर, तिवसा) आणि आकाश गौतम भडके (३२, रा. वाई बोथ, नांदगाव खंडेश्वर) यांना पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक मुलचंद भांबुरकर हे त्यांच्या पथकासह तिवसा परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी एका बोलेरोतून अमरावतीच्या दिशेने गांजा येत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पथकाने मोझरीजवळच्या नवीन बायपासवर नाकाबंदी केली असता एक विना क्रमांकाचे वाहन नागपूरकडून अमरावतीला येताना दिसले. हे वाहन थांबवून रवी राठोड आणि आकाश भडके या दोघांची पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना संशय आला व त्यांनी बोलेरोची झडती सुरू केली. त्यावेळी वाहनात दोन नंबर प्लेट दिसल्या तसेच दोन्ही टेल लॅम्पच्या आतमध्ये गांजा असल्याचे पोलिसांना जाणवले. त्यामुळे दोन्ही टेल लॅम्प काढले, त्यावेळी एका

टेललॅम्पच्या मागे ३५ किलो अशाप्रकारे दोन्ही लॅम्पमागून ७० किलो गांजाचे पॅकेट जप्त करण्यात आले. त्यानंतर आणखी गांजा असल्याची माहिती पोलिसांना असल्यामुळे पोलिसांनी वाहनाच्या खाली जाऊन पाहिले असता विशेष बनवलेले लोखंडी कप्पे दिसले. त्या कप्यातून पोलिसांनी आणखी ३५ किलो अशाप्रकारे एकूण १ क्विंटल ४ किलो ८७९ ग्रॅम

गांजा ज्याची किंमत २० लाख ६६ हजार ९६० रुपये तसेच ५ लाख ५० हजार रुपये असा एकूण २६ लाख १६ हजार ९६० ऐवज जप्त केला आहे. दरम्यान हा गांजा ओडिशातून बोलावणाऱ्याचा एलसीबीने शोध सुरू केला आहे. ही कारवाई एलसीबीचे पीआय किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय भांबुरकर व त्यांच्या पथकाने केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande