
गडचिरोली, 10 नोव्हेंबर (हिं.स.)
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ या योजनेचा २१वा हप्ता लवकरच वितरित होणार आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या नोंदींमध्ये ई-केवायसी अपूर्ण असणे, बँक खाते आधार क्रमांकाशी न जोडलेले असणे, तसेच जमिनीच्या नोंदींची पडताळणी प्रलंबित असणे अशा विविध त्रुटीमुळे पात्र लाभार्थ्यांना हप्त्याचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. तरी शेतकऱ्यांनी आपली नोंदणी तपासून त्यातील त्रुटी त्वरित दुरुस्त कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
लाभार्थ्यांनी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन आपले ई-केवायसी पूर्ण करावे. तसेच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असल्याची खात्री करून घ्यावी. संबंधित तहसील कार्यालय, तलाठी किंवा कृषी कार्यालयात संपर्क साधून जमिनीच्या नोंदीतील त्रुटींची पडताळणी करावी.
प्रधानमंत्री किसान पोर्टलवर आता ‘अपडेट मिसिंग’ नावाचा नवीन पर्याय उपलब्ध झाला असून, अपात्र झालेल्या किंवा त्रुटीपूर्ण माहिती असलेल्या लाभार्थ्यांनी सीएससी केंद्रात जाऊन हा पर्याय वापरून आवश्यक माहिती व कागदपत्रे जोडून नोंदी अद्ययावत कराव्यात.
योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी नोंदीतील सर्व त्रुटी तातडीने दूर कराव्यात, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond