
गडचिरोली, 10 नोव्हेंबर (हिं.स.)
कृषी विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यातील पाच प्रगतशील शेतकऱ्यांची विदेश अभ्यास दौर्यासाठी निवड करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांमध्ये दोन महाराष्ट्र राज्य कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी आणि तीन प्रगतशील शेतकरी यांचा समावेश असून, या दौर्याचा उद्देश परदेशातील प्रगत शेती तंत्रज्ञान, जलसंधारण प्रणाली, सेंद्रिय शेती, तसेच कृषी उत्पादनांच्या मूल्यवर्धनाविषयी प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे हा आहे.
ही अभ्यास सहल युरोप, इस्राईल, जपान, मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स या देशांमध्ये होणार असून, शेतकरी प्रतिनिधी मंडळ त्या देशांतील अत्याधुनिक सिंचन तंत्र, हरितगृह शेती, आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर आणि कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करणार आहे.
या दौर्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील श्री. परशुराम कोमाजी खुणे, गडचिरोली तालुक्यातील पारडी कुपी येथील श्री. चंद्रशेखर रामदास मुरतेली, गडचिरोली शहरातील श्री. बाळकृष्ण असुराज टेंभुर्णे आणि श्री. अरुण केवलराम हरडे तसेच वडसा तालुक्यातील आमगाव येथील श्री. विनोद रामचंद्र जक्कनवार या पाच शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी परशुराम खुणे, चंद्रशेखर मुरतेली आणि अरुण हरडे यांची युरोप दौर्यासाठी, विनोद जक्कनवार यांची जपान दौर्यासाठी, तर बाळकृष्ण टेंभुर्णे यांची मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स या देशांच्या अभ्यास दौर्यासाठी निवड झाली आहे.
या निवड प्रक्रियेसाठी कृषी विभागामार्फत जिल्हास्तरावर अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांपैकी प्रगत शेती करणाऱ्या, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या आणि उत्पादनवाढ व गुणवत्ता सुधारणा साधणाऱ्या शेतकऱ्यांची निवड निश्चित निकषांनुसार करण्यात आली. या पाच शेतकऱ्यांच्या अनुभवाचा लाभ जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनाही होणार आहे.
“गडचिरोली हा शेतीच्या दृष्टीने आव्हानात्मक जिल्हा असला तरी येथील शेतकऱ्यांनी नवकल्पकतेच्या माध्यमातून उत्तम प्रगती साधली आहे. या विदेश दौर्यामुळे त्यांना जागतिक शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव मिळेल आणि त्या माध्यमातून स्थानिक पातळीवर शेतीत नव्या संधी निर्माण होतील.” आसे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रिती हिरळकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond