
रायगड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। आदई ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच व शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) नेते विलास शेळके यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात शेळके यांना पक्षाची शाल देऊन स्वागत करण्यात आले. या प्रवेशामुळे पनवेल तालुक्यात शेकापला मोठा धक्का बसला असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, यतीन पाटील, अंकुश ठाकूर, भाईशेठ पाटील, सदाशिव पाटील, बाळाराम पाटील, एकनाथ मोकल आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, “भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्तेच पक्षाचा खरा कणा असून, अशा निष्ठावान आणि जनसंपर्क असलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद अधिक वाढते,” असे त्यांनी सांगितले. विलास शेळके यांच्यासह शेकापचे ज्येष्ठ नेते परशुराम शेळके, दीपक शेळके, विजय पाटील, संतोष म्हात्रे, राजेंद्र शेळके, दिनेश शेळके आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके