
अकोला, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।शिवणी विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाची मागणी अखेर पूर्णत्वास आली असून, राज्य शासनाने या कामासाठी तब्बल २०९ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. सोमवारी शासनाने याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला असून, या निर्णयानंतर अकोल्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. ही मंजुरी म्हणजे आ. साजिद खान पठाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फळ असल्याचे नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
शिवणी विमानतळाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. धावपट्टी विस्तारीकरणासाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे विमानतळ प्रकल्प ठप्प अवस्थेत होता. मात्र, पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आ. पठाण यांनी या विषयाला प्राधान्य देत सातत्याने शासनाच्या स्तरावर पाठपुरावा केला. आपल्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात त्यांनी अकोल्याचे आराध्यदैवत श्री. राजराजेश्वर मंदिराला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळावा तसेच अकोला विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी ठाम मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत, आता दोन्ही मागण्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राजराजेश्वर मंदिराच्या विकासास गती मिळाल्यानंतर आता विमानतळ विस्तारीकरणासाठी निधी मंजूर झाल्याने अकोल्याच्या विकासाच्या दृष्टीने हा टप्पा ऐतिहासिक मानला जात आहे. नागरिकांच्या मते, आ. पठाण यांच्या आमदारकीच्या काळात अकोल्याचा विकासात्मक कायापालट होणार असून, शहरात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, तसेच औद्योगिक व पर्यटन विकासालाही चालना मिळेल. अकोल्याचा सर्वांगीण विकास साधण्याच्या निर्धाराने काम करणाऱ्या आ. साजिद पठाण यांच्या या यशाबद्दल नागरिक, सामाजिक संस्था आणि व्यापारी वर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे