
रायगड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (महाविकास आघाडी) एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार असल्याची घोषणा रविवारी शेकाप भवन येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी अलिबाग नगराध्यक्षपदासाठी शेकापच्या अक्षया नाईक यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
त्याचबरोबर वॉर्ड क्रमांक पाचमधून काँग्रेसचे समीर ठाकूर आणि वॉर्ड क्रमांक सातमधून अभय म्हामुणकर यांची नगरसेवकपदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. या घोषणेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष उसळला. टाळ्यांचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी आणि “महाविकास आघाडीचा विजय असो!” अशा घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले.
या बैठकीस माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, रायगड बाजार समितीचे चेअरमन नृपाल पाटील, राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, जिल्हा सहचिटणीस अॅड. गौतम पाटील, तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते राजा ठाकूर, योगेश मगर, अॅड. उमेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.अक्षया नाईक या माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची कन्या असून सामाजिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या उमेदवारीची घोषणा होताच कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. अलिबाग नगरपरिषदेत २० नगरसेवकांच्या जागांसाठी ही निवडणूक होणार असून, या पार्श्वभूमीवर अक्षया नाईक यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीने युवा नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके