
मुंबई, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतः दमानिया यांनीच याबाबत उघड करत सांगितले की, काही विश्वसनीय सूत्रांकडून “माझा गेम केला जाणार” असा गंभीर इशारा मिळाल्याची माहिती त्यांना एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दमानिया म्हणाल्या की, “मी अमेरिकेत असताना मला एका सीनियर अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की त्यांच्या हाताला काही इनपुट मिळाले आहेत की तुमचा गेम केला जाणार आहे. काही लोकांना वाटतंय की ‘यांचा अति होतोय, यांचा गेम करायचाच’, अशा चर्चा त्यांच्या कानावर आल्या आहेत.” त्या पुढे म्हणाल्या की, “मला सांगण्यात आलं की तुम्ही प्रवासादरम्यान गाड्या बदलून वापरा, गाडी चालवताना फोन बंद ठेवा. फोन स्विच ऑफ ठेवलात तर चांगलं, असे स्पष्ट निर्देश मला देण्यात आले.”
या प्रकरणाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दिली असून त्यांनी तत्काळ राज्य सरकारला याबाबत सावधगिरीचे निर्देश दिल्याचे दमानिया यांनी सांगितले. त्यांनी पुढे उघड केले की, “सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी मिळाली त्या फोनच्या आदल्या दिवशीच मला हा इशारा मिळाला होता.”
धमकीचे गांभीर्य लक्षात घेता अधिकाऱ्यांनी त्यांना सुरक्षा घेण्याचा सल्ला दिला असला तरी दमानिया यांनी ती नाकारली आहे. त्या म्हणाल्या, “मला सिक्युरिटी घ्यायला सांगितलं आहे. मी एकदा नाही, दोनदा लिहून दिलं आहे की मला सिक्युरिटी नको आहे. मी सिक्युरिटी घेणार नाही. मी माझं काम सुरू ठेवणार.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule