
नाशिक, 10 नोव्हेंबर (हिं.स.)नाशिकचे पर्यटन आणि साहसी पर्यटन वाढवणे या उद्देशाने गेली ४ वर्षापासून अंजनेरी पर्वताच्या पायवाटांवर आयोजित होणारी अंजनेरी अल्ट्रा ट्रेल रन स्पर्धा यावर्षी 7 डिसेंबर रोजी होणार असून अत्यंत आव्हानात्मक आणि सुंदर अशा अंजनेरी पर्वतरांगातून ही स्पर्धा संपन्न होईल .माजी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल आणि ग्रेप काउंटीचे संचालक तेजस चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या अंजनेरी अल्ट्रा ट्रेल रन पाचव्या सिझनसाठीच्या टी-शर्टचे अनावरण नुकतेच करण्यात आले.
या प्रसंगी माजी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण चे आयुक्त जलज शर्मा, नाशिक पोलीस उपायुक्त (झोन २), किशोर काळे, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक चे उपसंचालक, प्रशांत खैरे, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक च्या उपसंचालिका गीता चव्हाण, होमिओपॅथिक सल्लागार डॉ. आशेर शेख,सुयश हॉस्पिटल चे जगदीश ओत्सवाल, ग्रेप काऊंटी चे संचालक तेजस चव्हाण , संचालिका गौरी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी तेजस चव्हाण यांनी यांनी स्पर्धेमागचा उद्देश, स्पर्धेचे स्वरूप आणि 'रन फॉर ग्रीन' या संकल्पनेची माहिती दिली. आजवर या स्पर्धेत ५ हजारांहून अधिक तर मागील वर्षी या स्पर्धेत देश-विदेशातील ७०० हून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला होता. यंदाच्या पाचव्या पर्वासाठी देखील अनेक धावपटूंनी नावनोंदणी सुरू केली आहे. नाशिकची ही खास स्पर्धा असल्याने, आयोजकांनी सर्व नाशिककरांना मोठ्या संख्येने यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
यावर्षी अंजनेरी अल्ट्रा ट्रेल रन मध्ये वापरली जाणारी पदके हि रिसायकल प्लास्टिकपासून बनवलेली आहेत आणि ट्रोफीज या पुन्हा वापरलेल्या लाकडापासून बनवलेल्या आहेत, जेणेकरून त्याचा पुनर्वापर होतो.तसेच या उपक्रमातून सहभागी प्रत्येक धावपटूच्या मागे अंजनेरी परिसराच्या आजूबाजूला ५,००० हून अधिक झाडे लावण्यात आली आहेत.त्याचबरोबर वन विभागाच्या भागीदारीने, ही धाव गिधाड संवर्धनाबद्दल देखील जागरूकता पसरवली जाणार आहे.
यावर्षी पासून अंजनेरी अल्ट्रा ट्रेल रन मध्ये जवळपासच्या २० ग्रामीण मुलांना सहभागासाठी प्रायोजित केले जाणार आहे , ज्यामुळे ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन मिळेल.एकूणच निसर्गासाठी, वन्यजीवनासाठी आणि अंजनेरीच्या लोकांसाठी अंजनेरी अल्ट्रा ट्रेल रन मध्ये धावणारे प्रत्येक पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे
स्पर्धा स्वरूप आणि नावनोंदणी प्रक्रिया:
अंजनेरी अल्ट्रा ट्रेलच्या पाचव्या सिझनची मुख्य स्पर्धा रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. यावर्षी स्पर्धेची थीम ‘रन फॉर ग्रीन’ अशी ठेवण्यात आली आहे. धावपटूंसाठी ५ किलोमीटर, १० किलोमीटर, १५ किलोमीटर, ३० किलोमीटर आणि अल्ट्रा रन ५० किलोमीटर असे विविध अंतराचे पर्याय उपलब्ध आहेत.
ही स्पर्धा ग्रेप काउंटी रिसोर्ट येथून सुरू होऊन त्र्यंबकेश्वर रोड, बेझे फाटा आणि विवेदा वेलनेस रिसोर्ट मार्गे पुन्हा ग्रेप काउंटी येथे समाप्त होईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक धावपटूला आकर्षक टी-शर्ट, मेडल, ई-सर्टिफिकेट देण्यात येईल . इच्छुकांनी आपली नावनोंदणी ऑनलाइन पद्धतीने www.anjaneriultratrail.com या वेबसाइटवर करावी. ऑफलाईन नावनोंदणी किंवा ग्रुप बुकिंगसाठी ७०३०११३००८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV