
गडचिरोली, 10 नोव्हेंबर (हिं.स.)
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा (पोकरा २.०) आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात असून, प्रकल्प अंतर्गत शेतकरी व भूमिहीन कुटुंबातील व्यक्तींच्या लाभासाठी अर्ज प्रक्रिया दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली आहे. प्रकल्पाच्या टप्पा-२ साठी नवीन आणि स्वतंत्र पोर्टल (https://dbt-ndksp.mahapocra.gov.in) सुरू करण्यात आले असून, या पोर्टलवर निवडक गावांमध्ये अर्ज स्वीकारले जात आहेत.
राज्यातील एकूण २१ जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबवला जात असून, या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ५५८ गावांचा समावेश आहे. ५ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी तसेच भूमिहीन कुटुंब या पोर्टलवर अर्ज करू शकतात. अर्जदारांनी नोंदणीसाठी याच संकेतस्थळाचा अथवा महाविस्तार ए आय अॅप्लिकेशनचा वापर करावा.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करणे हा आहे. प्रकल्पांतर्गत वानिकी आधारित वृक्षलागवड, बांबू लागवड, फळबाग लागवड, ठिबक सिंचन संच, वैयक्तिक शेततळे व अस्तरीकरण, गांडूळखत, बीज उत्पादन, रेशीम उद्योग आणि भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परितक्त्या व घटसपोटीत महिलांसाठी शेळीपालन यासह घटक सुरू करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांचे हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता आणि माहितीच्या अभावामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांवर उपाय म्हणून कृषी विभागाने 'महाविस्तार AI' हे अत्याधुनिक अॅप लाँच केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने हे अॅप मराठी भाषेत शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पद्धतींचे मार्गदर्शन उपलब्ध करून देते.
गडचिरोली जिल्ह्यात या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व ५५८ गावातील शेतकरी बांधवांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond