
सोलापूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। निवडणुकांच्या तोंडावर भाजप मतदाराना भुलवणाऱ्या योजना आणून लोकांची दिशाभूल करत असून लोकसभेला जी वज्रभूठ दाखवली ती वज्रमुठ आगामी नगरपालिका निवडणुकीत दाखवा, असे आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी सांगितले. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोगेश्वरी मंगल कार्यालयात झालेल्या काँग्रेस व मित्र पक्षाच्या विचार विनिमय बैठकीत ते बोलत होते.
व्यासपीठावर राज्य सचिव अॅड रविकरण कोळेकर,जिल्हा कार्याध्यक्ष अॅड नंदकुमार पवार, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, शहराध्यक्ष अॅड राहुल घुले, मारुती वाकडे ,अॅड अर्जुनराव पाटील, रामचंद्र वाकडे, मुरलीधर दत्तू,दत्तात्रय खडतरे, हणमंत दुधाळ, सुवर्णा चेळेकर, स्नेहल घुले, सुनिता अवघडे, दिलीप जाधव, किसन सावंजी, राजाभाऊ मेथकुटे, आदि उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष शाटगार पुढे म्हणाले,निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मत चोरी करून सत्ता हस्तगत करणे व सत्तेतून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करणे हा कार्यक्रम सुरू आहे. महागाई व जीएसटी या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक सुरू आहे. खा.प्रणिती शिंदे यांना सर्वसामान्यानी निवडून दिले यामध्ये मंगळवेढ्याचे मोठे ठरले.
कार्याध्यक्ष नंदकुमार पवार म्हणाले की लाडक्या बहिणीला दिल्या जाणाऱ्या पैशात त्या कुटुंबातील मोबाईलचा रिचार्ज देखील होत नाही. सत्ताधारी चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र यावे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे म्हणाले की आम्ही आमच्या पक्षात लोकशाही विचारधारा ठेवतो काँग्रेसची ताकद लोकसभेला दिसली आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही सर्व पक्षांना एकत्र आणू इच्छित आहोत. मात्र तसे न झाल्यास आम्ही स्वतंत्र लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड