
नंदुरबार, 10 नोव्हेंबर (हिं.स.) अक्कलकुवाच्या आमलीबारी घाटात रविवारी झालेल्या बस अपघाताबाबत धक्कादायक वास्तव अपघातातील शालेय बसची फिटनेस मुदत दोन महिन्यांपूर्वीच संपलेली असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. दरम्यान, या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत केवळ बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एका राजकीय पक्षाच्या नेत्याची संस्था असल्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरातून आदिवासी विद्यार्थ्यांना घेऊन अक्कलकुव्याकडे जाणारी शालेय बस आमलीबारीजवळ दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर ५२ विद्यार्थी जखमी झाले. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे येथील आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या अनुदानीत आश्रमशाळेत या विद्यार्थ्यांना नेण्यात येत होते. अपघातग्रस्त बस एमएच १५ एके १४५९ हिची फिटनेस ही २२ सप्टेंबर २०२५ मध्येच संपल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे बसची फिटनेस संपली होती, तर ती रस्तावर धावलीच कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अपघातानंतर पोलिसांनी फरार चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुध्द गुन्हा नोंदवला आहे. मात्र या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचेही उघड झाले आहे. बसमध्ये विद्यार्थ्यांसह, एक शिक्षक, एक कामाठी असे ५६ जण होते, असे सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या बसची सर्व कागदपत्रे जमा करण्याचे संबंधितांना आदेशीत केले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने कोंबड्यांसारखे कोंबून वाहतूक सुरु होती. मात्र अपघातानंतर संबंधीत टेम्पो घाटात अडवून त्यातील विद्यार्थ्यांना पालकांनी उतरवून घरी नेल्याचे समजते. त्यामुळे संस्था चालकाने विद्यार्थ्यांना आणण्यासाठी दोन बस आणि एक माल वाहतूक करणार टम्पो पाठवल्याचे उघड झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर