
कोल्हापूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।
चंदगड नगरपंचायतीसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपचे नेते आणि आमदार शिवाजीराव पाटील यांना शह देण्यासाठी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले. माजी आमदार राजेश पाटील आणि नंदाताई बाबुळकर यांनी आज गडहिंग्लज येथे पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून राजर्षी शाहू विकास आघाडीची घोषणा केली. दोघांच्या एकजुटीमुळे राष्ट्रवादीचा विजय होईल, असा मंत्री हसन मुश्रीफ यांनी दावा केला असून चंदगडमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडी म्हणून निवडणुक लढणार असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये एकत्र आले आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली आज गडहिंग्लज कार्यालय येथे कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला असून चंदगड नगरपंचायतीची निवडणूक ही एकत्रपणे लढत असल्याची घोषणा केली. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राजेश पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी चंदगडचे भाजपला पाठींबा दिलेले अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विरोधात मोट बांधली असून आगामी काळात काँग्रेसचे काही पदाधिकारी आपल्या सोबत येणार असल्याचा दावा या आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
चंदगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र काम करणार असून पुरोगामी विचारमुळे एकत्र आल्याचे डॉ. नंदाताई बाभुळकर आणि राजेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणुकीत डॉ. बाभुळकर या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार होत्या तर त्यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश पाटील लढले होते. त्या ठिकाणी अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांचा विजय झाला होता. नंतर त्यांनी भाजपला पाठींबा दिला.
काँग्रेसचे नेते आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आप्पी पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. बाभुळकर यांची भाजपच्या शिवाजीराव पाटील यांच्यासोबत देखील चर्चा झाली होती. मात्र आप्पी पाटील यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर बाभुळकर यांनी थेट माजी आमदार राजेश पाटील यांच्याशी युती केली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले,, कागल नगरपालिकेमध्ये भाजपचे नेते माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्याशी चर्चा होईल. गडहिंग्लजमध्ये भाजप सोबत चर्चा सुरु आहे. मुरगूडमध्ये प्रवीणसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्या ठिकाणी भाजपसोबत आघाडी होणं अवघड आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar