
जळगाव , 10 नोव्हेंबर (हिं.स.) शहरातील कांचन नगरातील विलास चौकात जुन्या वादातून झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला. आकाश उर्फ टपऱ्या युवराज बाविस्कर असं मृत तरुणाचं नाव असून तर या घटनेत अन्य तीन जण जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. गोळीबार करणारा आकाश सपकाळे हा पसार झालेला आहे.जळगाव शहरात रविवारी दुपारी क्रिकेटच्या वादातून तांबापुरा परिसरात झालेल्या दगडफेकीची घटनेचा तणाव निवळत नाही तोच रात्री कांचन नगरातील विलास चौकात जुन्या वादातून गोळीबार झाला. यामुळे किरकोळ वादातून जिल्ह्यात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. कांचननगर भागात दोन युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. हद्दपार आकाश सपकाळे उर्फ डोया आणि सागर सपकाळे यांच्यामध्ये जुना वाद आहे. आकाश रविवारी परिसरात संध्याकाळपासून धुसफूस सुरू होती. रात्री हा वाद वाढत जाऊन आकाश याने सागरच्या घरासमोर येऊन गोळीबार केला. यात सागर सपकाळे यांचे भाचे गणेश सोनवणे यांच्या हाताला तर तुषार रामचंद्र सोनवणे यांच्या कानाला व आकाश बाविस्कर यांच्या छातीत गोळी लागली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी आकाश बाविस्कर याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर