मुग, उडिद, सोयाबीन खरेदीला 15 नोव्हेंबरपासून प्रारंभ - परभणी जिल्हाधिकारी
शेतकऱ्यांचा बँक खात्यावर थेट जमा होणार रक्कम परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम 2025-26 साठी परभणी जिल्ह्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेडमार्फत मुग, उडिद व
शेतकऱ्यांचा बँक खात्यावर थेट जमा होणार रक्कम


शेतकऱ्यांचा बँक खात्यावर थेट जमा होणार रक्कम

परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम 2025-26 साठी परभणी जिल्ह्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेडमार्फत मुग, उडिद व सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी दिनांक 30 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आली असून प्रत्यक्षात खरेदी प्रक्रिया दि. 15 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले की, शेतकऱ्यांनी सदर उपक्रमाचा लाभ घेत असताना कोणताही दलाल किंवा मध्यस्थाच्या अमिषाला बळी पडू नये. आपले सोयाबीन, उडिद, मूग त्यांना देऊ नये किंवा त्यांच्यामार्फत कुठल्याही प्रकारचा व्यवहार करु नये. जेष्ठ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर न येण्यासाठी सवलत आहे, मात्र त्यांनी प्रतिनिधी म्हणून आपल्या कुटुंबातील सदस्यामार्फत नामनिर्देशन करुन शेतमाल जमा करावा. सर्वसाधारणपणे तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पैसे त्यांच्या आधारबेस खात्यावर जमा होतील. सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीने खरेदी केंद्राचे प्रस्ताव कृषी पणन मंडळाकडे पाठवावेत, जेणेकरुन त्या त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळच्या ठिकाणी केंद्र उपलब्ध होईल.

खरेदी केंद्राची वेळ -

खरेदी केंद्राची वेळ ही सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत राहील. दरम्यान खरेदी केंद्रावर आलेल्या शेवटच्या शेतकऱ्याची खरेदी प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी दिले.

केंद्र शासनाने मुग, उडिद व सोयाबीन खरेदीकरीता पुढीलप्रमाणे दर निश्चित केले आहेत --

मुग रु. 8,768/- प्रति क्विंटल, उडिद रु. 7,800/- प्रति क्विंटल, सोयाबीन रु. 5,328/- प्रति क्विंटल.

परभणी जिल्ह्यात खालील प्रमाणे नाफेडने नियुक्त केलेल्या खरेदी केंद्रांवर शेतकरी नोंदणी करण्यात येत आहे. --

केंद्राचे नाव व पत्ता पुढीलप्रमाणे आहे. जिंतूर तालुका जिनींग अॅन्ड प्रेसींग सह सो.लि. जिंतूर (पत्ता - सिध्देश्वर विद्यालय, खैरी प्लॉट, जिंतूर), पूर्णा तालुका सह. खरेदी विक्री संघ, पूर्णा (पत्ता-नवा मोढा, पूर्णा), मानवत तालुका सह खरेदी विक्री संघ,मानवत (पत्ता- मार्केट यार्ड मानवत), स्वस्तिक सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था (पत्ता- मार्केट यार्ड, पाथरी), स्वप्नभुमी सुशिक्षित बेरोजगार, सेवा सहकारी संस्था (पत्ता- सोनहारी वेअरहाऊस, शेळगाव रोड, सोनपेठ), तुळजाभवानी कृषी विकास सेवा सहाकारी संस्था म.बोरी (पत्ता-बोरी), परभणी तालुका सह खरेदी विक्री संघ, परभणी (पत्ता-नवा मोढा, परभणी), भूमीपुत्र फळे व भाजीपाला खरेदी विक्री व प्र.सह संस्था मर्या. वरपुड (पत्ता-वरपुड, ता. परभणी), कृषीराज फळे व भाजीपाला खरेदी विक्री व प्र. सह संस्था म.मिरखेल (पत्ता-झरी, ता. परभणी).

शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार मुंग, उडिद व सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घेण्याकरिता आपल्या शेतमालाची एफएक्यु (सरासरी दर्जा) दर्जानूसार नजीकच्या प्रतवारी केंद्रावरुन योग्य प्रतवारी करुन घेऊनच आपला एफएक्यु दर्जाचा शेतमाल खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी मदत होईल.

सोयाबीनसाठी शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार पुढीलप्रमाणे एफएक्यु (सरासरी दर्जा) दर्जाचा शेतमाल खरेदी करण्यात येईल -- माती, काडी, कचरा व बाहय पदार्थ डागी – 2 टक्के, चिमलेले, अपरिपक्व व रंगहीन – 5 टक्के, किड किंवा भुंगा लागलेले दाणे – 3 टक्के, मशिनने तुटलेले किंवा भेगा पडलेले दाणे – 15 टक्के, ओलावा – 12 टक्के.

नोंदणी कशी करावी --

शेतकऱ्यांनी मुग, उडिद व सोयाबीन विक्रीकरीता आपल्या गावाजवळील नाफेडच्या नजिकच्या खरेदी केंद्रावर जावुन किंवा नाफेडने तयार केलेल्या ई-समृध्दी मोबाईल अॅपवरुन मोबाईलद्वारे नोंदणी करावी.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे --

नोंदणीसाठी 7/12 उतारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक घेवुन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करुन घ्यावी. सदरील नोंदणी ही ऑनलाईन पध्दतीने पीओएस मशिनद्वारे करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, चालु वर्षाचा 7/12 उतारा, पिकपेरा इ. कागदपत्रासह नोंदणीकरीता प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

खरेदीकरीता आपणास एसएमएस प्राप्त झाल्यानंतर शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन यावा व जास्तीत जास्त शेतकयांनी सदरील उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande