
कोल्हापूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात या हंगामातील दक्षिणायन किरणोत्सव सोहळा विना अडथळा पार पडला. आज सोमवारी मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या मुखकमलापर्यंत आली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी या सुंदर क्षणाचा दर्शनासह लाभ घेताना श्री अंबामातेचा जयजयकार केला. श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा पश्चीमेकडील इमारतींचा आडोसा, ढगाळ वातावरण यांचा अडथळा न येता पार पडण्याबाबत भाविकांच्यात उत्सुकता असते. शनिवार पासून सुरु झालेल्या या अंबाबाईच्या किरणोत्सवात पहिल्या दिवशी किरणे देवीच्या खांद्यापर्यंत, दुसऱ्या दिवशी कानापर्यंत आली होती. तिसऱ्या दिवशी आज, सोमवारी किरणे मूर्तीच्या चेहऱ्यावर येऊन पुढे किरिटापर्यंत सरकली. पूर्ण क्षमतेने होत असलेला किरणोत्सवाचा सोहळा भाविकांनी उत्सुकतेने आणि उत्साहाने अनुभवला. देवीची आरती होताच, भाविकांनी श्री अंबामाता देवीचा जयजयकार केला. श्री अंबाबाईचा किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाल्याने भाविकांनी, करवीरवासीयांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा. मिलिंद कारंजकर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar