
नाशिक, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।
‘वर्ल्ड मायक्रोशिया दिना’निमित्त नाशिकच्या इंदोरवाला कान-नाक-घसा (ईएनटी) हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेला विशेष वैद्यकीय उपक्रम यशस्वीरित्या झाला. या उपक्रमात, जन्मतः कान नसलेल्या (मायक्रोशिया) तसेच कानाची नळी विकसित न झालेल्या (कॅनाल अट्रेसिया) रुग्णांना मार्गदर्शन केले. पुणे येथून आलेल्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. इतर रुग्णांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले.
एकदिवसीय उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नाशिकचे प्रख्यात पिनाप्लास्टी सर्जन डॉ. शब्बीर इंदोरवाला आणि मुंबईचे तज्ज्ञ डॉ. अशेष भुमकर यांनी एकत्र येऊन रुग्णांवर उपचार केले. उपक्रमाची सुरुवात नियोजनाप्रमाणे पुण्याच्या एका आठ वर्षीय रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करून झाली. या दोन्ही तज्ज्ञांच्या अनुभवामुळे रुग्णाला केवळ दिसणारा कानच नव्हे, तर ऐकण्याचे वरदान मिळण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
या दिवशी केवळ शस्त्रक्रियाच झाल्या नाहीत, तर जनजागृतीलाही तितकेच महत्त्व देण्यात आले. रुग्णांचे पालक आणि उपस्थितांसाठी डॉ. इंदोरवाला आणि डॉ. भुमकर यांनी एक विशेष सादरीकरण केले. यामध्ये, कानाची नळी तयार करणे (कॅनालप्लास्टी) आणि बाह्य कान तयार करणे (पिनाप्लास्टी) या शस्त्रक्रिया कशा केल्या जातात, यात कोणते अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते, याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
याशिवाय, अनेक गरजू रुग्णांनी आणि त्यांच्या पालकांनी हॉस्पिटलमध्ये येऊन मोफत सल्ला आणि मार्गदर्शनाचा लाभ घेतला. ज्यांना जन्मतः ऐकू कमी येते किंवा कान विकसित झालेले नाहीत, अशा रुग्णांना आता नाशिकमध्येच आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार मिळण्याचा मार्ग या उपक्रमामुळे खुला झाला आहे. याबाबत उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. भविष्यातही अशा रुग्णांसाठी हे उपचार हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहणार आहे. हॉस्पिटलमध्ये सिलिकॉन पिनाप्लास्टीची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे.
चार तास चालली आव्हानात्मक शस्त्रक्रिया
पुणे येथून आलेल्या बालकावर आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. इंदोरवाला हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या सुसज्ज पायाभूत सुविधा व निष्णात डॉक्टरांचा अनुभव यांची योग्य सांगड घातली गेल्याने ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. या बालकावरील ही शस्त्रक्रिया सकाळी ११ वाजता सुरु झाली. व पुढील ४ तास डॉक्टर व संपूर्ण टीम शस्त्रक्रिया यशस्वीतेसाठी परीश्रम घेत होती. अशा स्वरुपाच्या शस्त्रक्रियांमुळे विकसीत न झालेल्या कानाबाबत दिसण्याचे व ऐकण्याची संवेदना पुन्हा प्राप्त करणे शक्य होऊ शकणार आहे. हॉस्पिटलमध्ये सिलिकॉन इनरप्लास्टी सुविधादेखील उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांमुळे अपूर्ण विकसित किंवा विकसीत न झालेल्या कानाचे स्वरूप (दिसणे) आणि ऐकण्याची क्षमता पुन्हा प्राप्त करणे शक्य होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV