
शिक्षण हा मानवी जीवनाचा मूलाधार आहे. मनुष्य जन्मतः केवळ ‘जैविक अस्तित्व’ घेऊन येतो, परंतु शिक्षणामुळे तो ‘मानव’ होतो. विचार करणे, निर्णय घेणे, योग्य-अयोग्य यातील फरक ओळखणे, मूल्ये अंगीकारणे, समाजात सुसंवाद राखणे, प्रगतीकडे वाटचाल करणे या सर्व गोष्टी शिक्षणातून घडतात. म्हणूनच शिक्षणाला जीवनाचा ‘प्राणवायू’ म्हणणे सयुक्तिक ठरेल. ११ नोव्हेंबर हा ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर साजरा केला जातो. मौलाना आझाद यांनी शिक्षणाला केवळ रोजगाराचे साधन मानले नाही, तर त्यांनी शिक्षणाला राष्ट्रनिर्मितीचे साधन, सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आणि मानवतेचे संवर्धन करणारा आधारस्तंभ मानले. त्यांचा स्पष्ट विश्वास होता की शिक्षण हे सर्वांसाठी समानरित्या उपलब्ध झाले तरच समाजात खरी समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित होईल. म्हणूनच आजच्या काळात शिक्षणाच्या अर्थाचे, उपयोगाचे आणि गरजेचे नव्याने पुनर्मूल्यांकन करणे ही काळाची गरज आहे.
समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिल्यास समाज हा माणसांच्या परस्पर संबंधांचे, विचारांचे, संस्कृतीचे, अधिकारांचे आणि संस्थांचे गुंफण आहे. या संपूर्ण सामाजिक संरचनेचे मुख्य नियंत्रण शिक्षण करत असते. शिक्षण समाजात नवे विचार आणते, जुन्या परंपरांचे चिकित्सक पुनर्विलोकन करते, बदल स्वीकारण्याची प्रेरणा देते आणि समाजाला प्रगत दिशेने पुढे नेत राहते. शिक्षण हे फक्त ज्ञान देणे नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याची सर्जनशील प्रक्रिया आहे. समाज जसा बदलत जातो तसाच शिक्षणाचा आविष्कारही बदलत जातो. कालपरत्वे शिकविण्याच्या पद्धती, विषय, उद्दिष्टे, साधने, शिक्षक-विद्यार्थी नाते यांच्या स्वरूपात बदल होत गेले आहेत; परंतु शिक्षणाचा मुख्य हेतू आजही तोच आहे. माणसाला जगण्याची कला शिकविणे आणि समाज अधिक मानवी, न्याय्य व प्रगतिशील करणे.
भारतीय समाजाची ऐतिहासिक रचना पाहता शिक्षण नेहमीच सामाजिक स्तरांच्या आधारे नियंत्रित राहिले. प्राचीन काळातील गुरुकुल पद्धतीत ज्ञानाची देवाणघेवाण होत असली तरी सर्वांना समान संधी उपलब्ध नव्हती. काही विशिष्ट वर्णांना ज्ञान मिळण्याचा अधिकार होता, तर इतरांना ज्ञानापासून दूर ठेवण्यात आले. ज्ञानाचे हे केंद्रीकरण समाजातील असमानता वाढविणारे ठरले. मध्ययुगीन काळातही धार्मिक संस्था, राजकीय सत्ता आणि सामाजिक रूढी यांच्या आधारे ज्ञानाची मर्यादा घातली गेली. ब्रिटिश काळात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली, तर्कशास्त्रीय आणि वैज्ञानिक विचारांची जागृती झाली, पण त्याचा उद्देश भारतीय समाजाला ज्ञानसमृद्ध करणे नसून प्रशासनासाठी प्रशिक्षित कर्मचारी मिळवणे हा होता. स्वतंत्र भारताने मात्र शिक्षणाला समाजाच्या केंद्रस्थानी ठेवले. भारतीय संविधानाने शिक्षणाला मूलभूत अधिकाराचा दर्जा दिला. ‘समानता’ आणि ‘समावेशकता’ हे शिक्षणाचे मार्गदर्शक तत्व म्हणून ठरविले. परंतु आजही शहर व ग्रामीण भाग, आर्थिक स्तर, लिंग, जाती, प्रदेश, आदिवासी आणि दुर्बल गटांमध्ये शिक्षणाच्या संधींत प्रचंड अंतर आहे.
आज शिक्षणाच्या क्षेत्रात दिसणारी सर्वात मोठी असमानता म्हणजे ‘गुणवत्तेतील तफावत’. मोठ्या शहरांतील कॉर्पोरेट शाळा आधुनिक साधनांनी सुसज्ज आहेत, तर अनेक ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, प्रयोगशाळा-अभाव, डिजिटल सुविधांची मर्यादा, मुलींसाठी सुरक्षा आणि वाहतूक यांसारखी मूलभूत समस्या कायम आहेत. ज्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळते ते समाजात पुढे जातात; तर जे शिक्षणापासून वंचित राहतात ते मागे पडतात. अशा वेळी शिक्षण सामाजिक गतिशीलता थांबविण्याचे साधन ठरते, आणि समाजात नवीन असमानता अधिक स्पष्ट होत जाते. म्हणूनच शिक्षणाचा प्रसार करताना केवळ शाळांची संख्या वाढवणे पुरेसे नाही, तर शिक्षणाची गुणवत्ता, पोहोच, सुरक्षितता, समतोल निधी, प्रशिक्षित शिक्षक आणि प्रगत अभ्यासक्रम हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे ठरतात.
शिक्षणाचा खरा उद्देश समाजात विवेकपूर्ण नागरिक घडविणे हा आहे. केवळ पदव्या मिळविणे म्हणजे शिक्षित होणे नाही. शिकलेला मनुष्य तर्क करतो, विश्लेषण करतो, समस्या समजून त्यावर उपाय शोधतो, भेदभावाला प्रश्न विचारतो, अंधश्रद्धेला आव्हान देतो आणि न्याय्य समाजाच्या निर्मितीत सक्रिय सहभाग घेतो. लोकशाही राष्ट्रासाठी ‘सजग’ नागरिकांची निर्मिती ही शिक्षणाची सर्वात मोठी देणगी आहे. केवळ मतदान करणे किंवा कायदे माहित असणे म्हणजे नागरिकत्व नाही; तर समाजाच्या भल्यासाठी विचारपूर्वक कृती करणे, सामाजिक समरसता राखणे आणि राष्ट्रीय एकात्मतेला बळ देणे हा खरा नागरिकत्वाचा अर्थ आहे. शिक्षण व्यक्तीला ही समग्र जबाबदारीची जाणीव करून देते.
शिक्षणाशिवाय आर्थिक विकास शक्य नाही. आजचे युग ज्ञानाधारीत अर्थव्यवस्थेचे आहे. देशात उद्योग, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, विज्ञान, संशोधन, व्यवस्थापन या सर्व क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाची गरज आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हे रोजगारक्षमतेचे आणि रोजगारनिर्मितीचे मूळ आहे. देशाचा विकासदर, उत्पादनक्षमता आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता ही थेट शिक्षणाच्या पातळीवर अवलंबून असते. नवीन शिक्षण धोरण २०२० मध्ये कौशल्याधारित शिक्षण, बहुविद्याशाखीय शिक्षण, डिजिटल साक्षरता, संशोधन आणि नवोन्मेष यांना मिळालेला भर महत्त्वाचा आहे. मात्र, धोरणे तेव्हाच परिणामकारक ठरतात जेव्हा त्यांची अंमलबजावणी प्रामाणिकपणे, योजनेनुसार आणि सर्वसमावेशक दृष्टीकोनातून केली जाते.
शिक्षणात शिक्षकाची भूमिका केंद्रस्थानी आहे. शिक्षक म्हणजे ज्ञान देणारा, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे तो मूल्यांची संस्कृती रुजविणारा. शिक्षक विद्यार्थ्याच्या अंतर्मनातील प्रतिभा ओळखून तिला योग्य दिशा देतो. शिक्षण यशस्वी होण्यासाठी शिक्षक-विद्यार्थी संबंध विश्वास, आदर आणि सर्जनशील संवाद यांवर आधारित असणे आवश्यक आहे. आज तंत्रज्ञान शिक्षणात महत्त्वाची भूमिका निभावत आहे. ऑनलाइन शिक्षण, डिजिटल साधने, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पद्धती आल्या आहेत, परंतु मानवी भावनिक स्पर्श, प्रेरणा, सहानुभूती आणि संस्कार ही कामे शिक्षकच करू शकतो. ‘शिक्षक हा केवळ शाळेत शिकवणारा नसून, तो समाजाचा घडवणारा शिल्पकार आहे’ हे विसरून चालणार नाही.
स्त्री शिक्षण हा समाज परिवर्तनाचा महत्त्वाचा भाग आहे. स्त्री शिक्षित झाली तर कुटुंब शिक्षित होते, पुढची पिढी जागरूक होते, समाज प्रगत होतो. मुलींना माध्यमिक आणि उच्च शिक्षण मिळण्यात आजही ग्रामीण भागात अडथळे आहेत. सामाजिक अडथळे, लिंगभेद, पायाभूत सुविधांचा अभाव, लवकर लग्नाची प्रथा, सुरक्षिततेची चिंता हे प्रश्न दूर केल्याशिवाय ‘समता’ ही कल्पना केवळ घोषणेतच राहील. त्यामुळे मुलींना शिक्षण देण्याचे कार्य हे केवळ शासकीय धोरण नसून संपूर्ण समाजाने स्वीकारलेली मूल्यबद्ध जबाबदारी असणे आवश्यक आहे.
शिक्षणाचा आणखी एक महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे मूल्यशिक्षण होय. आज जग झपाट्याने बदलत आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाने सुविधा वाढल्या आहेत, पण माणसामधील भावनिक अंतरही वाढले आहे. स्वार्थ, स्पर्धा, सामाजिक तणाव, धार्मिक वैमनस्य, हिंसा आणि असहिष्णुता समाजात चिंतेचे विषय बनत आहेत. अशा वेळी शिक्षणाने फक्त ज्ञान न देता ‘मानवी मूल्ये’ पेरणे अत्यावश्यक आहे. सहजीवन, परस्पर आदर, करुणा, जबाबदारी, सहिष्णुता, संवेदनशीलता ही मूल्ये शिकवणारे शिक्षण राष्ट्राला स्थिर, मजबूत आणि सुदृढ बनवते.
राष्ट्रीय शिक्षण दिन हा केवळ एका नेत्याची जयंती नाही. तो शिक्षणाच्या मूल्यांचा पुनःस्मरणाचा, समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचविण्याच्या संकल्पाचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला सांगतो की शिक्षणात असमानता राहिली, तर समाजातही समता निर्माण होऊ शकत नाही. शिक्षण सर्वांना समानरित्या उपलब्ध झाले, गुणवत्तापूर्ण झाले, मूल्याधारित झाले आणि सर्वसमावेशक झाले तर समाज आपोआप न्याय्य, सुसंस्कृत आणि प्रगतिशील बनेल. म्हणून आजच्या राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्ताने आपण हे स्पष्टपणे ठरवूया की शिक्षण हे केवळ करिअर घडविण्याचे साधन नाही, ते ‘जीवन घडविण्याची कला’ आहे. शिक्षण हे केवळ स्पर्धेसाठी नाही, ते ‘समानतेसाठी’ आहे. शिक्षण हे केवळ व्यक्तीला उंचावण्यासाठी नाही, ते ‘समाज आणि राष्ट्र उंचावण्यासाठी’ आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जी कुणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तसेच मौलाना अबुल कलाम आझाद यांनी म्हटले होते की शाळा बंद पडली तर राष्ट्र बांधणे थांबते. म्हणून शिक्षणाचा दिवा फक्त प्रज्वलित करायचा नाही, तर सतत तेजस्वी ठेवायचा आहे. कारण शिक्षण हे भविष्य घडवते, आणि घडवलेले भविष्यच राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करते.
डॉ. राजेंद्र बगाटे (लेखक समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत) मो. ९९६०१०३५८२, ईमेल - bagate.rajendra5@gmail.com
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी