
कोल्हापूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।
रत्नागीरी-नागपूर महामार्गाच्या मोजणीसाठी हातकणंगले तालुक्यातील चोकाक ते अंकली दरम्यानच्या बाधित शेतकऱ्यांना १० नोव्हेंबरच्या मोजणी नोटीसा पुन्हा शेतकऱ्यांना आल्याने आज, सोमवारी सकाळी संतप्त शेतकऱ्यापैकी विजय पाटोळे या शेतकऱ्याने भूमी अभिलेख कार्यालयासमोरच झाडाला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला रोखल्याने पुढील अनर्थ टळला.
रत्नागीरी-नागपूर मार्गाच्या चोकाक ते अंकली दरम्यानच्या बांधित शेतकऱ्यांनी जमिनीची चौपट भरपाई देण्याचा निर्णय झाल्याशिवाय मोजणीला हात लावू देणार नाही असा पवित्रा २७ ऑक्टोबरच्या आंदोलनात घेतला होता. यावेळी चौपदरी रस्ताच्या मोजणी बाबत जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेवून निर्णय घेण्याचे आश्वासन उपजिल्हाधिकारी रुपाली चौगुले यांनी २७ ऑक्टोबरच्या आंदोलनावेळी दिले होते.
१० नोव्हेंबर रोजी पुन्हा अतिग्रे गावच्या शेतकऱ्यांना मोजणीच्या नोटीसा आल्याने सोमवारी शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयासमोर सकाळी १० वाजताच ठिय्या मारला. दरम्यान, विजय पाटोळे या शेतकऱ्याने कार्यालयासमोरच झाडाला गळफास घेण्यास प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. ११ पर्यंत अधिकारी कर्मचारी कार्यालयाकडे फिरकलेच नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयाला टाळे ठोकले.
तालुका भूमी अभिलेखचे कर्मचारी अतिग्रे व अंकली हातकणंगले तालुक्यातील चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, हातकणंगले, मजले या गावातील चौपदरी महामार्गासाठी जमिनी मोजण्याच्या नोटीसा देण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शेतकरी सोमवारी सकाळीच ९ वाजता हातकणंगले येथील भूमिअभिलेख कार्यालया समोर जमा झाले. त्यांनी कार्यालया समोर ठाण मांडले. आंदोलकानी कार्यालया समोरच जेवण बनवून सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar