
रायगड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। ऑनलाईन गुंतवणुकीत जास्त परतावा मिळेल या आमिषाने तब्बल ₹27 लाख 96 हजार 851 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार माणगाव पोलिस ठाणे हद्दीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 20 ऑगस्ट ते 20 ऑक्टोबर या कालावधीत नानोर, माणगाव येथे ही घटना घडली. आरोपीताने फिर्यादी शारदा थोरे (रा. मुंबई-गोवा हायवे, नानोर, माणगाव) यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून, स्वतःला ‘नुवमा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड’ कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादींना एका लिंकद्वारे अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगून, त्यावर ट्रेडिंग गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले.
३० टक्के जास्त परतावा मिळेल, असे सांगून आरोपीने फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यानुसार फिर्यादींनी अॅप्लिकेशनच्या माध्यमातून जवळपास ₹27.96 लाखांची गुंतवणूक केली. मात्र त्यानंतर ना परतावा मिळाला, ना मूळ गुंतवणूक रक्कम — परिणामी त्यांची मोठी आर्थिक फसवणूक झाली.
या प्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. 271/2025 अंतर्गत माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 (सुधारित 2008) कलम 66(c), 66(d) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305, 331(3), 331(4), 324(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असून, अनोळखी लिंक व ऑनलाईन गुंतवणुकीपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके