
परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।
सेलूतील लक्कडकोट येथील रहिवाशांचा पीटीआर प्रश्न निकाली काढा असे पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांना रहिवाशांनी निवेदन दिले आहे
सेलू शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 बी लगत असलेल्या लक्कडकोट परिसरातील नागरिकांना 58 वर्षांपासून वास्तव्यास असूनही आजतागायत स्थायी मालकी हक्क (पीटीआर) मिळालेला नाही. या न्याय्य मागणीसाठी येथील रहिवाशांनी परभणीच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे तातडीने पीटीआर मिळवून देण्याची मागणी केली आहे.
लक्कडकोट परिसरात सुमारे 55 घरे असून सुमारे 300 हून अधिक नागरिक 1967 पासून वास्तव्यास आहेत. तथापि, या नागरिकांना अद्याप हक्काची जमीन मिळालेली नाही. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, तत्कालीन जागामालकांकडून ही जागा खरेदी करून तत्कालीन नगराध्यक्ष स्वर्गीय श्रीरामजी भांगडिया यांनी ती नगरपालिका ताब्यात दिली होती. त्यानंतर काही भागातील नागरिकांना पीटीआर मिळाला असला, तरी उर्वरित लक्कडकोट भाग प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अद्याप वंचित आहे. या संदर्भात गेल्या काही दशकांपासून रहिवाशांनी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, अद्याप ठोस निकाल लागलेला नाही. त्यामुळे अखेर नागरिकांनी पालकमंत्री साकोरे बोर्डीकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
दरम्यान, यापूर्वी शहरातील गायत्री नगरमधील रहिवाशांनाही अशाच समस्येला सामोरे जावे लागत होते. मात्र, पालकमंत्री साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकारामुळे त्या भागातील पीटीआर प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे आता लक्कडकोट रहिवाशांनाही आपल्या दीर्घकालीन समस्येवर तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis